सोलापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या 'भारत राष्ट्र समिती'चा झेंडा घेऊन कार्यकर्ते हैदराबादहून ६०० वाहनांच्या ताफ्यासह 27 जून रोजी सोलापुरात आले होते. केसीआर यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे सोलापुरातील अनेक स्थानिक राजकीय नेत्यांचा भारत राष्ट्र समितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. केसीआर यांचे आषाढी वारीला विठ्ठलाच्या दर्शनाचे निमित्त होते. त्यांनी दौऱ्यात सोलापूरच्या नेत्यांना 'बीआरएस' पक्ष प्रवेशाची साद दिली होती.
केसीआर यांना सोलापूरातून गिफ्ट : केसीआर यांना 'रिटर्न गिफ्ट' देण्यासाठी सोलापुरातील १०० वाहनांचा हा ताफा हैदराबादकडे निघाला आहे. भाजप बाहेर पडलेले 4 माजी नगरसेवक देखील 'बीआरएस' पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. केसीआर यांच्या दौऱ्याने भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीत मात्र अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादीमधील भगीरथ भालके यांनी 'बीआरएस'मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपमधील चार माजी नगरसेवकांनी राजीनामा देत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेले हे चार नगरसेवक 'बीआरएस'च्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांनी आधीच 'बीआरएस' पक्षात प्रवेश करून सोलापुरात याचा प्रचार देखील सुरू केला आहे.
केसीआर यांच्या शक्तिप्रदर्शनाचे पडसाद उमटले : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी २७ जूनला सोलापुरात येऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावात झालेल्या शेतकरी मेळाव्यात सत्ताधारी भाजप-शिंदे सरकारला आव्हानही दिले होते. पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पक्षप्रवेश करून त्यांचा ताफा पुन्हा सोलापुरात आला होता. हा ताफा भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या दारासमोर जाऊन थांबला. केसीआर यांनी सोलापुरातील राजकीय वातावरणात ढवळाढवळ केल्याने भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या भुवया उंचावल्या होत्या. सोलापुरातील पूर्व भागातील राजकीय नेते हे 'बीआरएस' पक्षात जाहीर प्रवेश करण्यासाठी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. हे बघता केसीआर यांच्या शक्तीप्रदर्शनाचे पडसाद उमटू लागले आहेत.
हेही वाचा: