सोलापूर - सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याचा गुन्ह्याचा तपास करत असताना दोन पोलीसांची नावे निष्पन्न झाली होती. यामध्ये जयप्रकाश कांबळे व पोलीस शिपाई किर्तीराज अडगळे यांविरोधात देखील दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. 20 ऑगस्टला रोजी पोलीस हवालदार जयप्रकाश चंद्रशा कांबळे व पोलीस शिपाई कीर्तीराज शाहूराज अडगळे, यांवर गुन्हा दाखल झाला होता. दरोड्याच्या गुन्ह्यात कांबळे हा संशयित पोलीस आरोपी अटक आहे. तर दुसरा संशयित पोलीस किर्तीराज अडगळे हा विजापूर नाका पोलीस ठाण्यातून पळून गेला आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बुधवारी (26 ऑगस्ट) कारवाईचा बडगा उचलत दोन्ही पोलिसांना निलंबित केले असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोरेगाव येथील एम. एम. कलशेट्टी यांच्या मालकीची शेतजमिनीत आहे. त्याबाजूला उद्योगपती राम रेड्डी यांची देखील शेतजमीन आहे. शेताच्या बांधावरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. उद्योगपती राम रेड्डी यांच्या सांगण्यावरून 25 मार्च, 2020 रोजी विनोद संदीपान चुंगे, सागर नील कदम, सुरज बबनराव शिखरे, फैजअहमद सैफन ढाले आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शेतजमिनीवरील तारेचे कुंपण नष्ट करण्यासाठी शेतात गेले होते. त्याला विरोध करणाऱ्या वॉचमनला या टोळीतील एकाने हातातील तलवारीचा धाक दाखवून त्याचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. याबाबत 25 मार्च, 2020 रोजी कलशेट्टी यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. तक्रारीवरुन टोळीविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत होते. तपासात पोलीस कर्मचारीही कांबळे व अडगळे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेटे यांनी ताबडतोब कांबळे यास अटक केले. तर अडगळे यास देखील पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. अटक होणार या भितीने अडगळे याने शौचास जाण्याचा बहाणा करुन 20 ऑगस्टला सायंकाळी पोलिसांची नजर चुकून पोलीस ठाण्याच्या भिंतीवरून उडी मारून पळ काढला. तर कांबळे याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या कांबळे हा न्यायालयायीन कोठडीत आहे.
या प्रकरणी बुधवारी हवालदार जयप्रकाश कांबळे व पोलीस शिपाई किर्तीराज अडगळे यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तात्काळ कारवाई करत दोघांना निलंबित केले.
पोलिसांना सापडेना पोलीस
पोलीस ठाण्यातून शौचाचे बहाणा करून पळून गेलेला पोलीस शिपाई किर्तीराज अडगळे अद्याप देखील फरार आहे. पोलिसांना पोलीस सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांना याबाबत विचारणा केले असता, तपास सुरू आहे एवढीच माहिती दिली जात आहे. त्यासाठी शोध पथक नेमले का? किंवा त्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात तपास पथक गेले आहे का? याबाबत काहीही माहिती दिली जात नाही. दरोडा प्रकरणात पोलिसांना पोलीस मिळत नसल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
हेही वाचा - कोरोना रुग्णांवर उपचारासाठी पंढरपुरात लवकरच सुरू होणार कोविड रुग्णालय