सोलापूर- माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे शासनाच्या अन्न सुरक्षा व अंत्योदय योजनेतील १७ पोती गव्हाचा अपहार केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ७ मे रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कुर्डूवाडी-बारलोणी रोडवरील एका शेतातील गोडाऊन जवळ उघकीला आला. या प्रकरणी ट्रक चालक व ठेकेदार या दोघांविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रक चालक जावेद पठाण (रा. कुर्डूवाडी) व ठेकेदार रमेश शहा (रा.मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माढा तहसीलचे प्रभारी पुरवठा निरीक्षक शबाना कोरबू यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा पुरवठा कार्यालयाचे वाहतूक प्रतिनिधी निवृत्ती लांडगे हे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे माढा व करमाळा तालुक्यात रेशनचे गहू व तांदूळ वितरित करतात. याचे टेंडर मुंबईचे क्रिएटिव्ह कन्झ्यूमर्स को-ऑप. सोसायटी लिमिटेडचे प्रोप्रायटर रमेश शहा यांच्याकडे असून शहा हे शहरातील वेगवेगळ्या लोकांकडून ट्रक भाड्याने घेऊन शासकीय मालाची वाहतूक करतात.
७ मे रोजी सायंकाळी ६ वाजता क्रिएटिव्ह कन्झ्यूमर्सकडून कुर्डूवाडी गोडाऊनमधून ४९१ पोती गहू ट्रक चालक जावेद इमाम पठाण याच्या ताब्यात देण्यात आले आणि पठाण यांना हे धान्य शासकीय गोडावून जेऊर येथे पोहोचवायला सांगितले. काल सकाळी ६ च्या सुमारास माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना कुर्डूवाडी-बारलोणी रोडवर हा ट्रक संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे दिसून आले. त्यानंतर, पुरवठा अधिकारी शबाना कोरबू व मंडलाधिकारी विजयकुमार जाधव, तलाठी अंकूश मेहर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता ट्रकमध्ये फक्त ४७४ पोती गहू आढळून आले. ट्रकमध्ये १७ पोती (८ क्विंटल) गहू कमी असल्याचे निदर्शनास आल्याने सदर ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला. १७ पोती गव्हाचा अपहार केल्याप्रकरणी ट्रक चालक पठाण व ठेकेदार शहा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.
हेही वाचा- भाजपकडून विधानपरिषदेसाठी रणजितसिंह मोहिते-पाटलांना उमेदवारी जाहीर