सोलापूर - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. हजारो लोकांचा जीव या विषाणूमुळे गेला आहे. अशातच करमाळा तालुक्यातील 15 डॉक्टरांचा ग्रुप पर्यटनासाठी उझबेकिस्तान येथे गेल्याची माहिती असून ते ताश्कंद शहरात अडकल्याची माहिती मिळत आहे.
करमाळा शहरासह तालुक्यातील कुंभारगाव, कोर्टी, सावडी, कंदर, जेऊर येथील डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. यातील काही डॉक्टरांनी आपल्या मित्रमंडळींना फेसबुक, व्हाट्सअपच्या माध्यमातून तत्काळ आम्हाला भारतात घेऊन जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशा प्रकारची विनंती केली आहे. आठवडाभरापूर्वी हे डॉक्टर परदेश दौऱ्यावर गेले होते.
हेही वाचा - कोरोनासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल
सध्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे प्रवासावर मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता या डॉक्टरांच्या ग्रुपसमोर मायदेशात माघारी परत येण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांसह त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक काळजीत पडले आहेत. राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीने या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी डॉक्टरांच्या संघटनेनी केली आहे.
या डॉक्टरांच्या ग्रुपने डिसेंबरमध्ये दौरा नक्की केला होता. ते भारतातून 10 मार्चला उझबेकिस्तानला जाणार असताना तेथे कोरोना अजिबात नव्हता. त्यांना 10 मार्चला जाण्यासाठी व 17 मार्चला परतण्यासाठी विमानसेवा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी रात्री बारा वाजता ते परतीच्या प्रवासाला निघणार होते. परंतु, सकाळी दहा वाजता विमानाचा प्रवास होऊ शकत नसल्याची माहिती त्यांना दिली गेली आहे. त्यामुळे विमानसेवा रद्द असल्यामुळे या डॉक्टरांना भारतीय प्रशासनाची चर्चा करण्याविषयी सांगण्यात आले आहे.
यामध्ये अडकलेल्या डॉक्टरांबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला कळवण्यात आले आहे. स्थानिक डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ते सर्व डॉक्टर व्यवस्थित आहेत. मायदेशात परत येण्यासाठी त्यांना शासकीय यंत्रणेकडून सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा आहे. दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटलांकडे डॉ. अमोल घाडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या डॉक्टरांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. त्यावर मोहिते-पाटलांना लवकरच केंद्र शासनाशी संपर्क साधून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा - वडिलांचे अधुरे स्वप्न मुलांनी केले पूर्ण, भारतीय सैन्य दलात झाले दाखल