सोलापूर - आतापर्यंत फक्त सोलापुरातच असलेल्या कोरोनाच्या विषाणूने ग्रामीण भागातदेखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकूळ या गावात कोरोनाचा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे, सोलापुरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 61 झाली असून रविवारी एका दिवसात 11 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत 61 पैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून 56 जणांवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
रविवारी सोलापुरात आणखी ११ रुग्णांची भर पडली आहे. या आढळून आलेल्या ११ रुग्णांमध्ये एका 57 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सारी आजारामुळे या महिलेला शनिवारी दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी तिचा मृत्यू झाला असून तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर, इतर रुग्णांमध्ये 2 शास्त्रीनगर आणि प्रत्येकी एक पाच्छा पेठ, कुरबान हुसेन झोपडपट्टी, नई जिंदगी, तालुका पोलीस ठाणे परिसर, यशवंत सोसायटी, कर्णिक नगर, आयकर नगर आणि एसआरपी वसाहत तसेच, मोहोळ तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
आत्तापर्यंत 1 हजार 228 रुग्णांपैकी 1 हजार 052 जणांचे अहवाल आले आहेत. यात 991 निगेटिव्ह तर 61 जणंचे अहवाल पॉझिटिव्ह असून 176 अहवाल प्रतीक्षेत आहेत. आत्तापर्यंत फक्त सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळत होते. मात्र, आता ग्रामीण भागातदेखील कोरोनाचे रुग्ण आढळायला लागले आहेत. शनिवारी सांगोला तालुक्यात एक रुग्ण आढळला होता तर रविवारी मोहोळ तालुक्यातली पाटकूळ या गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. कोरोना ग्रामीण भागात शिरला असल्यामुळे आता प्रशासनाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.