सिंधुदुर्ग - जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तसेच लॉकडाऊनचे बरेचसे नियम शिथिल केले आहेत. यामुळे काही प्रवासी आपल्या जिल्ह्यात येऊ शकतात आणि यातून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जिल्हावासीयांनी शासन व आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी केले आहे. कोरोनामुक्त जिल्हा होण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभागाबरोबरच थेट लोकसमुहाशी जोडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचाही मोठा वाटा असल्याचे सांगून या स्वताचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे डॉ. चाकूरकर यांनी विशेष आभार मानले आहेत.
रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यालगत कोरोनाचे तीन मोठे हॉटस्पॉट आहेत. या सर्व ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यावहारिक नाते जोडलेले आहे. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित केवळ एक रुग्ण सापडला होता. यामुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतर्क झाले. तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. संबधित रुग्णाचे गावही आयसोलेट करण्यात आले. जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा तातडीने बंद करण्यात आल्या. जिल्ह्यात भरणारे आठवडा बाजार बंद करण्यात आले. याला जिल्हावासियानीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सगळ्यातून आज एक चांगली बातमी आली टी म्हणजे सिंधुदुर्ग कोरोनामुक्त झाला.
या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर बोलत होते. जिल्ह्यात जरी काही प्रमाणात लॉकडाऊन शिथिल झाले तरी कोरोनाचे संकट आजही टळलेले नाही. त्यामुळे काळजी ही घेतलीच पाहिजे असे डॉ. चाकूरकर यांनी सांगितले. जिल्हा कोरोनामुक्त व्हायला जिल्हावासीयांचा मोठा हातभार आहे. मात्र जिल्हावासीयांनी आजवर राखलेला संयम अजून काही दिवस राखला पाहिजे. कारण जिल्ह्यातील संकट टळलं असेल मात्र जिल्ह्याच्या सीमेवर अजूनही कोरोनाचा विषाणू तळ ठोकून आहे. त्यामुळे तो जोपर्यंत पूर्णतः नष्ट होत नाही तोपर्यंत काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आपल्याकडे असल्याचे ते म्हणाले.
आपल्याला थोडा ताप किवा सर्दी असल्यास तत्काळ जवळच्या फिवर क्लिनिक मध्ये जा आणि तपासून घ्या, असे आवाहन त्यांनी जिल्हावासीयांना केले आहे. कोरोनाच्या या लढाईत आपले सहकारी डॉक्टर, नर्स यांच्यासोबतच सफाई कामगारांचे मोठे योगदान लाभले आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन आपल्याला लाभाल्यचे डॉ. चाकूरकर म्हणाले. जनतेने आजवर आम्हाला जसे सहकार्य केले तसेच यापुढे करून आपला जीव धोक्यात घालू नये आणि दुसऱ्याचाही घालू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.