सिंधुदुर्ग - दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी गावात एक जंगली हत्ती दाखल झाला आहे. या हत्तीने एका युवकाचा पाठलाग करून हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिलारी नदीच्या कालव्यात उडी घेत त्या युवकाने आपला जीव वाचवला. मात्र या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. नागरिकांकडून या रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
वन विभागाच्या हत्ती पकड मोहीम तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाय योजनांमुळे मागील काही वर्षात हे प्रमाण कमी झाले होते. मात्र, सध्या पुन्हा दोडा मार्गात हत्ती येण्याचे सत्र सुरू झाले आहे. दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी गावात एक रानटी टस्कर आढळून आला आहे. त्याच्याकडून परिसरातील केळी, नारळ तसेच इतर फळबागांचे नुकसान होत आहे. हत्तीच्या वर्दळीमुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.
हत्ती गावालगत दाखल झाल्यामुळे काही धाडसी तरुणांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्ती घनदाट झाडीत शिरल्यामुळे युवक माघारी फिरले. हत्तींना कोणीही हुसकवण्यासाठी पुढे जाऊ नये. ते पाणी पिण्यासाठी खाली आले असावेत. कोणीही आपला जीव धोक्यात घालू नये. तसेच शेतीच्या नुकसानीची भरपाई नियमानुसार दिली जाईल, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.