सिंधुदुर्ग - व्हेल माशाच्या महागड्या उलटीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ( Sindhudurg police crime branch ) गोव्यातील तिघांना व्हेलच्या उलटीची वाहतूक करताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच कोटी रुपयांची उलटी जप्त करण्यात ( Ambergris seized in Sindhudurg ) आली आहे. ही कारवाई शनिवारी बांदा गांधी चौक येथे करण्यात आली.
उलटीची वाहतूक केल्या प्रकरणी काँन्टनटिनो फीलोमीनो फर्नाडिस (सालशेत-मडगाव), जुजू जोस फेरीस (सालशेत-मडगाव) व तनिष उदय राऊत (१८, तोरसे, लंगरबाग) यांना ताब्यात घेण्यात आले. गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बांद्यात सापळा रचून ही धाडसी कारवाई केली. संरक्षित प्राणी, व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) या बेकायदेशीर व्यापार करणाऱ्या आरोपींचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला.
व्हेल माशाच्या उलटीची किंमत कोट्यवधी रुपये!
व्हेल माशाची उलटी म्हणजे समुद्रातील तरंगते सोने असे मानले जाते. हा पदार्थ स्पर्म व्हेल माशाच्या पोटात तयार होतो. या पदार्थाचा वापर हा अति उच्च प्रतिचा परफ्युम, औषधांमध्ये तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य तसेच खाद्य पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठीदेखील केला जातो. या पदार्थाची खरेदी विक्री करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे. या पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोट्यवधी रुपयांमध्ये किंमत आहे.
हेही वाचा-Son Killed Father in Kolhapur: अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मुलाकडून पित्याची निर्घृण हत्
दोन वाहने घेतली ताब्यात
वन्य संरक्षित प्राणी व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररित्या विकण्याकरीता बांदा परिसरात येणार असल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार बांदा गांधी चौक येथे सापळा रचण्यात आला होता. गोव्यातील तीन संशयितांकडून व्हेल मासा उलटीसह स्विफ्ट कार (जीए ०८ एम ५०५५) व मोटर सायकल (जीए ०३ ०५४९) ताब्यात घेतली. एका पिशवीमधून ५ किलो २३२ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी ताब्यात घेण्यात ( Whale vomit seized in Sindhudurg ) आली आहे. त्याची किंमत साधारणतः ५ कोटी ३२ लाख २० हजार रुपये इतकी आहे.
वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल
तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेत वन्य प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्रा दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. लसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या सुचनेनुसार कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, हेड काँस्टेबल अनिल धुरी, आशिष गंगावणे, प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रवीण वालावलकर, पोलीस नाईक चंद्रकांत पालकर, पोलीस काँस्टेबल ज्ञानेश्वर कांदळगांवकर, प्रथमेश गावडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.