सिंधुदुर्ग - नाणार रिफायनरी प्रकल्प होणारच, नाही झाला तर सरकार पाडून होणार, असे इशारा भाजप प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिला आहे. तसेच सीएसआर फंडातून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दोन टॉयलेट दिले नाहीत, म्हणून खासदार विनायक राऊत यांनी नाणार रिफायनरी या 3 लाख कोटींच्या प्रकल्पाला विरोध केला असून मी दलाल असल्याचे खासदार राऊत यांनी सिद्ध करावे, अन्यथा भर चौकात माफी मागावी, असे आव्हानही जठार यांनी दिले आहे. कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येथील दलालीशी संबंध असेल तर त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावे अन्यथा कणकवलीच्या पटवर्धन चौकात येवून माफी मागा. तुम्हाला दोन टॉयलेट मिळाले नाहीत, म्हणून दीड लाख लोकांना रोजगार देणारा नाणार प्रकल्प घालवला. आमचा खासदार दोन टॉयलेटच्या लायकीचा आहे, हे सांगायला आम्हाला लाज वाटते, असेही प्रमोद जठार म्हणाले. नाणार रिफायनरी प्रकल्प होणारच, असे सांगताना हा प्रकल्प झाला नाही, तर सरकार पाडून होईल, असेही आव्हान त्यांनी यावेळी दिले.