सिंधुदुर्ग - आंबोलीमध्ये हत्तीच्या कळपाचा मुक्त संचार अजूनही कायम आहे. हे हत्ती शेतीचे मोठे नुकसान करत आहेत. दोडामार्ग, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यात हत्तींमुळे जास्त नुकसान होत आहे. फणसवाडी येथे रात्री नाचणीचे शेत राखायला गेलेल्या प्रथमेश गावडे आणि रूपा गावडे यांचा पाठलाग टस्कराने केला. एका ठिकाणी लपल्यामुळे वाचले. हत्तीचा हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हत्ती हटाओ या मोहिमेमुळे काही अंशी परिणाम झाला, मात्र दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचे वास्तव्य कायम आहे.
हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी
आंबोलीत कोल्हापूर हद्दीतील हत्ती उपद्रव करतात. आजरा, चंदगड भागांत त्यांचा मुक्त संचार होतो. फणसवाडी येथे हत्तींनी भातशेती आणि नाचणीच्या शेतीचे नुकसान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नांगरतास भागात हत्तींचा कळप दिसत आहे. त्यातील एक मोठा टस्कर तर आंबोली तसेच आजरा हद्दीवर घाटकरवाडी आणि फणसवाडी धरण भागात बऱ्याचदा दिसून येतो. हत्तींना हटवावे तसेच नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. यावर्षीही पुन्हा शेतीचे नुकसान होण्याची स्थानिकांना भीती वाटत आहे. हत्तींचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, अशी मागणी शेतकरी रूपा गावडे, बाळकृष्ण गावडे, संजय गावडे, गजानन गावडे यांनी केली आहे.
फणसवाडी येथे रात्री नाचणीचे शेत राखायला गेलेल्या प्रथमेश गावडे आणि रूपा गावडे यांचा पाठलाग टस्कराने केला. ते धावत एक मांगरात लपल्यावर हत्तीने रात्रभर घिरट्या घातल्या. हा हत्ती निवासी भागात फिरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून गस्त सुरू आहे, असे वनविभागाचे वनसेवक बाळा गावडे यांनी सांगितले.