सिंधुदुर्ग - दोडामार्ग येथील मुळस हेवाळे नदीवरील पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. या घटनेला महिना उलटूनही अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नदीच्या मधोमध एक दिवसीय धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महिनाभरात या नदीवर नवीन पूल बांधला नाही तर, याच ठिकाणी बेमुदत उपोषणाचा इशारा देखील येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
मागील महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याने मुळस हेवाळे पूलाचा जवळपास अर्धाअधिक भाग पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेला. काही दिवसांपूर्वी पुलाचा कोसळलेला भाग तात्पुरता दुरुस्त करण्यात आला होता. मात्र, ती मलमपट्टीही कुचकामी ठरली. पुलाअभावी गावकऱ्यांना गावात जाण्यासाठी दूरवरचा फेरा मारावा लागत आहे.
काही वर्षांपूर्वी तिलारी पाटबंधारे प्रकल्पाने खरारी नदीवर मुळस हेवाळे जोडणारा तात्पुरता पूल बांधून लोकांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था केली होती. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने हे कुचकामी ठरले. त्यामुळे नव्या पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यासाठी जयवंतराव देसाई, झुजे लोबो आणि स्थानिक ग्रामस्थांनी पुलासाठी चळवळ उभी केली होती.
तिलारी यांत्रिकी विभाग आणि गावकऱ्यांनी नदीतील गोटे वाहून गेलेल्या भागात पसरवून दोन्ही भाग जोडून तात्पुरती वाहतूक सुरू केली होती. मात्र, ही मलमपट्टीही कुचकामी ठरली आहे. त्यामुळे महिनाभरात या नदीवर नवीन पुल बांधला नाही तर, याच ठिकाणी आमरण उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी ग्रामस्थ मायकल लोबो म्हणाले की, गेली 30 वर्ष आम्ही या पुलाची मागणी करत आहोत, मात्र कोणीच लक्ष देत नाही. कालबद्ध वेळेत हे पूल पूर्ण झाले नाही तर, आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत.
हेही वाचा - भरवस्तीत दफन करण्यात आलेला 'तो' मृतदेह सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने काढला बाहेर