सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील आंबोली घाटात खोल दरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला. सुमारे ३६ वर्ष वयाच्या महिलेचा हा मृतदेह असून तिचा घातपात करून तिला या दरीत फेकून दिल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील बेपत्ता महिलेचा हा मृतदेह आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.
आंबोली पर्यटनाचे केंद्र ठरत असतानाच अलीकडच्या काळात मृतदेह फेकून देण्याचे किंवा काटा काढण्यासाठी प्रमुख ठिकाण बनले आहे. त्यामुळे पोलिसांची करडी नजर या ठिकाणी कायम असते. आंबोली येथील घाटात आढळून आलेला मृतदेह ३६ वर्षीय महिलेचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरीत असलेल्या मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून तो नेमका कोणाचा हे अद्यापपर्यंत कळू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक शिवाजी मुळीक, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत व पोलीस सहाय्यक निरीक्षक योगेश जाधव, उपनिरीक्षक स्वाती यादव, हवालदार दत्ता देसाई, गजानन देसाई, मंगेश कदम, मयूर सावंत, विलास नर , पोलीस पाटील विद्या चव्हाण आदी त्या ठीकाणी दाखल झाले. संबंधित मृतदेह हा तालुक्यातील बेपत्ता महिलेचा असल्याचा संशय काही लोकांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे, असे सावंतवाडी पोलिसांनी सांगितले.