सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. रस्त्यातील खड्ड्यात चक्क वृक्षारोपण करून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या खड्ड्याभोवती रांगोळीही घातली आहे.
वेंगुर्ले राज्य मार्गावर पिंगुळी येथे शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने रस्त्यावरच्या खड्डयात झाडं लावून आंदोलन करण्यात आलं. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रात्रीचा प्रवास करणे खूपच जोखमीचे झाले आहे. सध्या देशात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. याचाच प्रशासनाने फायदा घेत जिल्ह्यातील राज्य मार्गाना पडलेल्या खड्ड्यांंकडे दुर्लक्ष केले. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींंनी देखील डोळेझाक केली आहे. त्यांचे डोळे उघडण्याचे काम शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना करत आहे, असे संघटनेचे कार्यकर्ते रमाकांत नाईक यांनी सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी यावेळी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांंभोवती रांगोळी काढून हे आंदोलन लक्षवेधी केले. या आंदोलनाने प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग न आल्यास संपूर्ण जिल्ह्यातील राज्य मार्गांवर तीव्र आंदोलने करू, असा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनात सुशांत नाईक, रमाकांत नाईक, वासिम शेख, रुपेश दळवी, महेश अडसुळे, देवेश रेडकर, सचिन जामदार, मयूर बांदवलकर आदी सदस्य सहभागी झाले होते.
या मार्गावरून सातत्याने प्रवास करणारे सचिन जामदार हे वाहनचालक म्हणाले, कि काही वर्षांपूर्वी याच मार्गावर माझा खड्ड्यात आदळून अपघात झाला होता. त्यामुळे मला मार लागला आणि अजूनही त्याचा त्रास होतो आहे. मला सातत्याने त्याकरता डॉक्टरकडे जावं लागतं. आम्ही मेल्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग येणार आहे का, असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तर शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेचे कार्यकर्ते सुशांत नाईक यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमचे हे आंदोलन आहे, असे सांगितले. आम्ही खड्ड्यात झाडे लावली आहेत. किमान यामुळे तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग येईल, अशी आम्हाला आशा वाटते, असेही ते म्हणाले. गेली अनेक वर्ष आम्ही या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहोत. जिल्ह्यातील अनेक मार्गांची स्थिती अशीच असल्याचेही ते म्हणाले.