सिंधुदुर्ग - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. सिंधुदुर्ग इथे खासदार नारायण राणे यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. सिंधुदुर्गात अमित शाह यांची उपस्थिती भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. शनिवारी या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र, शेतकरी आंदोलनामुळे हा दौरा एक दिवस पुढे ढकलला गेला. या दौऱ्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्याच्या घडामोडींबद्दल काय वक्तव्य करतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
शाह यांच्यासोबत अनेक नेत्यांची उपस्थिती..
वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे जंगी स्वागत करण्यात आले. अमित शाह गोवा येथून हेलिकॉप्टरने दुपारी दीड वाजता मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. दरम्यान या उद्घाटनासाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार, नेते विनोद तावडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.