सिंधुदुर्ग - मालवण सर्जेकोट येथील समुद्रात मासेमारीस गेलेली मच्छीमारांची एक बोट बुडाल्याचा प्रकार घडला. त्या बोटीला वाचविण्यासाठी गेलेली दुसरी बोटही बुडाल्याची घटना घडली. या दोन्ही बोटीवरील सात मच्छीमारांना वाचविण्यात यश आले आहे, तर एक मच्छीमार बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
दिवाकर देऊलकर असे बेपत्ता झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे. रमेश देऊलकर (२६), केशन फोंडबा (२४), परेश फोंडबा (२८), यशवंत देऊलकर (३०) हे चौघे मच्छीमारीसाठी गेेलेल्या पातीवर होते, तर बेपत्ता दिवाकर यांच्यासह राजू देऊलकर, (२६) रजनीकांत देऊलकर (२४), प्रसाद आडकर हे चौघे त्यांना वाचविण्यासाठी गेले होते. अचानक जोराच्या लाटा उसळल्यामुळे हा प्रकार घडला, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले. वाचविण्यात आलेले तिघे अत्यवस्थ झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अन्य चौघांची प्रकृती चांगली आहे. याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.