सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळावरून गणेश चतुर्थीच्या पुर्वसंधेला विमान प्रवास सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार दिपक केसरकर उपस्थित होते.
'चिपी विमानतळ वाहतूकीसाठी सज्ज'
डीजीसीए आणि एयरर्पोट अथॉरिटीने ज्या दुरूस्त्या सुचवल्या होत्या त्याचे पालन करून विमानतळ आता वाहतूकीसाठी सज्ज झाले आहे. तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी आणि पंजाबवरून मशिनरी मागवली होती. तर, बाहेरून इतर टेक्नॉलॉजी मागवली होती. त्यांनी रनवेच्या पुर्नबांधणीचे काम केले आहे, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.
'विमान कंपनीचे अधिकारी इथे येऊन थांबलेले आहेत'
या कामाचा कंपल्शन रिपोर्ट आयआरबी कंपनीने डीजीसीएकडे पाठवलेला आहे. आता डीजीसीएने पाहणी करून लाईसन्स दिले की कोणत्याही क्षणी विमान वाहतूक सूरू होईल. विमान कंपनीचे अधिकारी इथे येऊन थांबलेले आहेत. त्यांचे टीकिट काऊंटरही रेडी झालेले आहेत. त्यामुळे लायसन्स मिळाल्याच्या आठ दिवसात हा एअरपोर्ट सुरू होईल. अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिली.
'आता केवळ डीजीसीएची परवानगी बाकी'
चतुर्थीपूर्वी विमानतळ सुरु होईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना दिले होते. त्याला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दुजोरा दिला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी हा विमानतळ नक्की सुरु होऊ शकतो. केवळ आता डीजीसीएची परवानगी बाकी आहे. अन्य, कामे पूर्ण झालेली आहेत. ही परवानगी मिळताच विमानतळ सुरु होईल असेही ते म्हणाले.