सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच असून संध्याकाळ नंतर पावसाचा जोर वाढला आहे. कुडाळ तालूक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. त्यामुळे येथील आंबेरी पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे तर पुढील २७ गावांचा तालूक्याशी संपर्क तूटला आहे.
कुडाळ तालुक्यातील २७ गावांचा संपर्कही तुटला..
माणगाव खोऱ्यात गेले तीन -चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निर्मला नदी दूथडी भरून वाहत आहे. ठिकठिकाणी पुराचे पाणी शेतीत घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर २७ गावांचा संपर्कही तुटला आहे. दरम्यान पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाकडून नदी लगत असलेल्या गावांना सतरकेचा इशारा देण्यात आला आहे.
नदीलगत असलेल्या गावांना सतर्कतेचा ईशारा..
नदीच्या प्रवाहातून वाहून आलेली झाडे पुलाला अडकलेली आहेत. त्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तर सद्य स्थितीत नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कामानिमित्त आलेले लोक माणगावातच अडकले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाकडून नदी लगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काही भागात सकाळ पासून वीज पुरवठाही खंडित..
जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून काही भागात सकाळ पासून वीज पुरवठाही खंडित झाला आहे. कणकवली तालुक्यातील नांदगाव वाशिनवाडी येथील लक्ष्मण आत्माराम मोरये व भरत आत्माराम मोरये या बंधूंच्या राहत्या घराची अतिवृष्टीमुळे पडझड झाली आहे. दोघांचे मिळून ९४,४०० रुपयांचे नुकसान झाले असून याचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे नांदगाव येथील अजून ७ घरे कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.