सिंधुदुर्ग - पुण्याहून गोव्याकडे निघालेल्या एका लक्झरी बसला वैभववाडी कुरुळ घाटात आग लागल्याची घटना समोर आली आहे. मनीष ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने अचानक पेट घेत बस जळाल्याची घटना आज (गुरुवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. वैभववाडी करूळ घाटात एडगांव घाडीवाडी नजीक ही घटना घडली आहे.
ट्रॅव्हल्समधील ३७ प्रवासी बचावले आहेत. एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच सर्व प्रवाशांना बसमधून उतरवून सुरक्षित स्थळी नेले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मनीष ट्रॅव्हल्स (जीए ०३ /डब्लू २५१८) ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजीक बस आली असता बसने अचानक पेट घेतला. चालकाच्या ही घटना लक्षात येताच त्याने बस थांबवली. बसमधील प्रवासी खाली उतरले. बसमधून धुराचे लोळ येऊ लागले आणि क्षणात बसने अधिकच पेट घेतला.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली. दरम्यान महामार्ग विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही तासात कुडाळ येथील अग्निशमन बंब दाखल झाला. आग विझवण्यात आली आहे. या घटनेनंतर एडगांव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही तासांनी वाहने मार्गस्थ करण्यात आली.