सिंधुदुर्ग - कोरोनानंतर सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर आता नवीन संकट आले आहे. मासेमारी बोटींवर काम करणाऱ्या खलाशांमध्ये एका गुढ आजाराची लक्षणे आढळली असून मालवणमध्ये एका खलाशाचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्हा रुग्णालयात या आजाराचे 9 रुग्ण दाखल झाले आहेत. मागील दोन दिवस मालवण ग्रामीण रुग्णालयाचे पथक थेट समुद्र किनारी जाऊन खलाशांची तपासणी करत आहे. येथे 576 खलाशी काम करतात आत्तापर्यंत 200 पेक्षा जास्त खलाशांची तपासणी करण्यात आली आहे.
तोंड, हात-पाय सुजणे, फिट येणे, उलटी, ताप येणे अशी या आजाराची लक्षणे असून हा आजार फक्त खलाशांमध्येच दिसून आला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या पूर्वी असा आजार कोणताही आजार आढळला नव्हता. सध्या फक्त सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील खलाशांमध्ये हा आजार आढळून आला असून आरोग्य विभाग त्याची कारणे शोधत आहे. या आजाराची कारणे शोधण्यासाठीच मेडिकल कॅम्प घेतला असल्याचे मालवण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या सावटात प्रभावित झालेला मासेमारी व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी 20 एप्रिलपासून परवानगी देण्यात आली आहे. मासेमारी व्यवसायावर प्रत्यक्ष अवलंबून असलेली 30 हजार कुटुंब आणि अप्रत्यक्ष अवलंबून असलेली 15 हजार कुटुंब यामुळे सुखावली. मात्र, आता खलाशांमध्ये आलेल्या या गुढ आजाराने मच्छिमारी व्यवसाय बंद होईल, याची भीती त्यांना वाटू लागली आहे.
अगोदरच मासेमारीचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात हे नवे संकट अधिक बळावले तर पुढचा हंगाम सुरू होईपर्यंत मच्छिमार कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी प्रतिक्रिया मासे विक्री करून आपले कुटुंब चालवणाऱ्या मनीषा जाधव यांनी दिली. शासनाने या गुढ आजाराला गंभीरपणे घेऊन मच्छिमारांना जास्तीत जास्त आरोग्य सुविधा उपलब्द करून घ्याव्यात, अशी मागणी मच्छिमार नेते अरविंद मोंडकर यांनी केली आहे.