सिंधुदुर्ग - जिल्हा प्रशासनातर्फे राबवण्यात आलेले लॉकडाऊन अन्यायकारक असल्याचा आरोप सिंधुदुर्ग व्यापारी संघटनेने केला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या निषेधार्थ व्यापारी संघाने बंद पुकारला असून त्याला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी संबंधित 'बंद'ला पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.
सिंधुदुर्गमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र, याला व्यापारी संघाचा विरोध आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशात त्रूटी असून आदेशाच्या सुरुवातीलाच कोणीही बाहेर पडू नये, असे म्हटले आहे. तसेच कोणत्या ठिकाणची दुकाने उघडणार, याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे संबंधित आदेश दुरुस्त करून लागू करावा अन्यथा सर्व दुकाने बंद करावीत, अशी मागणी व्यापारी संघाने केली.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय न घेतल्यामुळे या लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी महासंघाने बुधवारी संध्याकाळी उशिरा बंद जाहीर केला. हा बंद जिल्हाभर पाळण्यात आला आहे. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला अलगीकरणात ठेवणे. तसेच योग्य आरोग्य तपासणी करणे, हे उपाय अंमलात आणून कोरोनावर नियंत्रण मिळवता येते. मात्र, कायम कडक लॉकडाऊनचा अवलंब केल्याने व्यपाऱ्यांना नुकसान सोसावे लागले, अशी भूमिका व्यापारी वर्गाने मांडली आहे. यामुळे व्यपाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.