सिंधुदुर्ग - एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. पगाराची सात तारीख उलटल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. आपली दिवाळी अंधारात घालवावी लागणार असल्याची खंत त्यांना वाटत आहे. शासनाच्या या धोरणाचा निषेध करतानाच आज एसटी कामगार संघटनेने आक्रोश आंदोलन केले आहे. संघटनेच्या पदाधिकारी व कामगारांनी आपापल्या घरीच हे आक्रोश आंदोलन करून शासनाला जाग आणण्याचे काम केले आहे. आज सिंधुदुर्गात एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी आपापल्या घरी आक्रोश आंदोलन केले.
एसटीचे उत्पन्न घटल्याने वेतन मिळत नसल्याने अनेक कामगारांवर घर चालवण्यासाठी भाजीपाला विक्री, भाड्याने वाहन चालवण्याची वेळ आली. अनेकांनी कौटुंबिक अडचण, लग्न समारंभ, घरबांधणी अशा विविध कारणांसाठी कर्ज घेतले आहे. मुळातच कमी वेतन असताना अशा कर्जामुळे कोरोना काळात हप्ते फेडणे अवघड झाले. यामुळेच आक्रोश आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे या कर्मचाऱ्यानी यावेळी सांगितले.
सफाई कामगाराची काय आहे व्यथा...
दिवाळी तोंडावर आली असताना आम्हाला पगार नाही. घर कसे चालवायचे हा प्रश्न आहे. मुलांची, कुटुंबाची जबाबदारी माझ्या एकट्यावर आहे. अशी आपली व्यथा अक्काताई केरबा पाटील यांनी बोलून दाखवली. त्या कणकवली एसटी डेपोत सफाईचे काम करतात.
कर्मचारी काय म्हणाले...
अविनाश चंद्रकांत दळवी हे कर्मचारी म्हणाले शासनाने इतर कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिला आहे. शिक्षकांसारखे कर्मचारी घरी असताना त्यांना शासन पगार देत आहे आणि अत्यावश्यक सेवेतील आमच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे. त्यामुळे शासनाने हा दुजाभाव सोडावा आणि आमच्या हक्काचा पगार शासनाने द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हे आत्मक्लेश आंदोलन केल्यानंतर तरी आपला पगार मिळावा अशी अपेक्षा हे कर्मचारी करत आहेत आणि आपला पगार न मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचे संकेतही एसटी कर्मचाऱ्यांनी दिले आहेत.