सिंधुदुर्ग - जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णाला आता डिस्चार्ज देण्यात आलाय. यानंतर जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नसल्याने बाधितांची संख्या शून्य झाली आहे. मात्र, तरीही सिंधुदुर्गचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सरकारी नियमांचा उल्लेख केला. सरकारी नियमावलीप्रमाणे जिल्ह्यातील शेवटचा कोरोनाबाधित रुग्ण निगेटिव्ह आल्यानंतर २८ दिवसांत एकही बाधित न सापडल्यास जिल्ह्याला ग्रीन झोन घोषित करण्यात येते. यासाठी 28 दिवसांचा कालावधी पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेला एकमेव रुग्ण निगेटिव्ह झाला आहे. संबंधित व्यक्तीचा आयसोलेशनचा काळ पूर्ण झाल्यानंतर त्याचा शेवटचा अहवालदेखील निगेटिव्ह आला. मात्र, एकही रुग्ण नसताना राज्य शासनाने जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये केल्याने नागरिक नाराज आहेत. याबाबत आमदार नितेश राणे यांनीदेखील ट्वीट करत भावना व्यक्त केल्या होत्या.