सिंधुदूर्ग - दक्षिण कोकणातील राजकारणी चर्चा ही संपूर्ण राज्यात होत असते. सिंधुदूर्गातील राजकारण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भोवती फिरत असते. मात्र, २०१४ च्या निवडणूकीत राणेंना धक्कादायक पराभव स्विकारावा लागला होता आणि काँग्रेसच्या तिकिटावर त्यांचे चिरंजीव नितेश राणे निवडून आले होते. यंदा नारायण राणेंसह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलीनीकरण आणि कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश झाला आणि कणकवली-देवगड मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे उमेदवार म्हणून निश्चित झाले. या महत्वाच्या मतदारसंघासोबत कुडाळ आणि सावंतवाडी या मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघ -
महाराष्ट्रात झालेल्या २०१४ विधानसभा निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस च्या नितेश राणे यांनी 74 हजार 715 एवढी मते घेत विजय मिळवला होता. कणकवली विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजप चे प्रमोद जठार होते. त्यांना 48 हजार 736 मते मिळाली होती. जठार यांचा 25 हजार 979 मतांनी पराभव झाला होता. कणकवली विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनेचे सुभाष मयेकर तर, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल रावराणे आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष चे विजय सावंत होते. यंदाच्या निवडणूकीचे चित्र मात्र वेगळे आहे. कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यापुढे शिवसेनेच्या सतीश सावंत यांचे आव्हान आहे. त्यामुळेच येथील लढत ही संपूर्ण कोकणात हाय व्होल्टेज लढत ठरणार आहे.
कुडाळ विधानसभा मतदारसंघ -
२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत नारायण राणेंना धक्कादायक पराभावाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षात असणाऱ्या नारायण राणेंना कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभूत केले होते. नाईक यांनी 70 हजार 582 एवढी मते घेत विजय मिळवला होता. नारायण राणेंना 60 हजार 206 मते मिळाली. आणि त्यांचा 10 हजार 376 मतांनी पराभव झाला. कुडाळ विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर भाजप चे बाबा मोंडकर, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस चे पुष्पसेन सावंत आणि पाचव्या क्रमांकावर बसपा चे रविंद्र कासळकर होते. यंदाच्या निवडणूकीसाठी शिवसेनेकडून वैभव नाईक परत मैदानात उतरले असून त्यांच्यासमोर काँग्रेसच्या चेतन मोंडकर यांचे आव्हान असणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ -
२०१४ च्या निवडणूकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी 70 हजार 902 एवढी मते घेत विजय मिळवला होता. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे राजन तेली होते. त्यांना 29 हजार 710 मते मिळाली. आणि त्यांचा 41 हजार 192 मतांनी पराभव झाला. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचे चंद्रकांत गावडे, चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश दळवी आणि पाचव्या क्रमांकावर मनसेचे परशुराम उपरकर होते. यंदाच्या निवडणूकीसाठी या मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक केसरकर परत रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे बबन साळगावकर यांचे कडवे आव्हान असणार आहे.