सिंधुदुर्ग - जिल्हावासियांनी कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. आज जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कोरोनाची लस घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.
लाभार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन लस घ्यावी
प्रत्येकाने कोविडची लस घ्यावी, आपल्या कुटुंबियांनाही लस द्यावी. कोणीही मागे राहू नये, जिल्ह्यात आतापर्यंत 60 टक्के लसीकरण झाले आहे. तरी उर्वरीत लाभार्थ्यांनी ही स्वतः पुढाकार घेऊन लस घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी केले.
लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे
सर्वांनी लवकरात लवकर लस घेऊन सहकार्य करावे, सर्व सहकारी व नातेवाईक यांना याविषयी आश्वस्त करावे व लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी यावेळी केले. आपला जिल्हा लवकरात लवकर कोरोनामुक्त करून जिल्ह्यातून कोरोना हद्दपार करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांना तीनवेळा संधी
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याला 8,500 लस उपलब्ध झाली आहे. या दुसऱ्या टप्प्यात महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे. लस देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देणे सुरूच असून काही जणांनी लसीकरणाच्या यादीत नाव असूनही लस घेतली नाही. अशा लोकांना लस घेण्यासाठी तीनवेळा संधी दिली जाणार आहे.
दरम्यान आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लस घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.