सिंधुदुर्ग - छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवणाऱ्या कर्नाटक सरकार व मुख्यमंत्र्यांचा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध केला. यावेळी सावंतवाडी येथील गवळीतिठा परिसरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे यांनी मुंडन करून निषेध नोंदवला तर जिल्ह्याच्या अन्य भागातही निषेध करण्यात आला.
बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आला आहे. तेथील एका गटाने पुतळा बसविण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत विरोध केला होता. त्यामुळे पुतळ्यावरुन तेथे शिवप्रेमी आणि एका गटामध्ये तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर शिवप्रेमीमधून संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही दिसुन येत असताना आज सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी, वेंगुर्ले, कुडाळ, दोडामार्ग शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सावंतवाडी येथील गवळीतिठा परिसरात कर्नाटक मुख्यमंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. तर कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या.
यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर, शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, अशोक दळवी, उपजिल्हा संघटक शब्बीर मणीयार, नगरसेविका भारती मोरे, महिला संघटक अपर्णा कोठावळे, रश्मी माळवदे, प्रशांत कोठावळे, महेश शिरोडकर,संजय माजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तर मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी कर्नाटक शासनाने काढून टाकलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन:श्च सन्मानाने त्याठिकाणी बसवून संपूर्ण शिवभक्तांची व महाराष्ट्र वासियांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.
फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यामध्ये येण्याच्या अगोदर कर्नाटक शासनाने छत्रपतींचा अवमान केल्याप्रकरणी सर्वप्रथम आपले मत व्यक्त करावे आणि यानंतर छत्रपतींच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करावा, असे आवाहन केले आहे. उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नितीन वाळके, महेश कांदळगावकर यांनीही कर्नाटक शासनाचा निषेध नोंदवला व समस्त शिवसैनिकांची निषेधाची भूमिका कर्नाटक शासनापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राउत, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या माध्यमातून पोहोचवू, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.