सिंधुदुर्ग (ओरोस) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सिंधुदुर्गमध्ये सभा होत आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांचे ओरोस येथे आगमन झाले आहे. कालच नितेश राणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली येथे सभा झाली. त्यानंतर उद्धव यांची आज कणकवली आणि सावंतवाडी येथे सभा होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कणकवलीच्या सभेत कोणावर तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - नारायण राणे अखेर भाजपवासी; स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन
कालच नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये विलीन करण्यात आला. नारायण राणे, त्यांचे पुत्र निलेश राणे यांच्यासह स्वाभिमानच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. राज्यात सेना-भाजपची युती असताना कोकणात मात्र युतीतच खरी लढत होत आहे. कणकवलीमधून शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या विरोधात स्वाभिमान पक्षाचे म्हणजेच आता भाजपचे नितेश राणे रिंगणात आहे. त्यामुळे येथे भाजप-शिवसेना असा थेट सामना होणार आहे. कालच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी नितेश राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी येथे सभा घेऊन एकप्रकारे शिवसेनेला आव्हान दिल्याचे चित्र आहे.
हेही वाचा - कणकवलीत राणेंना भिडणारे काँग्रेसचे राणे आहेत तरी कोण?
शिवसेनेचा विरोध असताना भाजपने नारायण राणेंना जवळ करणे पसंत केले आहे. इतके दिवस लांबणीवर पडलेला त्यांचा पक्षप्रवेश ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाहीर सभेत करत त्यांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? कोणावर तोफ डागणार याची उत्सुकता आहे.