सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील जी 15 गावे गरुवारी इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ती गावे राधानगरी अभयारण्यासाठीचे संवेदनशील क्षेत्र जाहीर केले त्यातील आहेत. कस्तुरीरंगन समितीने शिफारस केलेल्या 192 गावांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबतची माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी आधी माहिती करून घ्यावी आणि नंतरच आपले अज्ञान प्रकट करावे, असा टोला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.
आमदार वैभव नाईक म्हणाले, इकोसेन्सिटीव्ह झोनमध्ये सिंधुदुर्गातील जी 15 गावे समाविष्ट करण्यात आली आहेत ती केवळ राधानगरी अभयारण्य क्षेत्रापुरतीच मर्यादित आहेत. कस्तुरीरंगन कमिटीने तयार केलेला अहवाल हा पश्चिम घाटासाठी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, गोवा आणि केरळ या सहा राज्यांसाठी लागू आहे. त्यात संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 गावांचा समावेश आहे. कस्तुरीरंगन अहवाल लागू करावा की नाही यासंदर्भात अद्यापही केंद्र सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 गावांमध्ये इको सेन्सिटिव्ह झोन लागू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्याची माहिती न घेताच निलेश राणे यांनी आपण काढलेल्या मोर्चाला यश आल्याचे जनतेला भासवले आहे.
निलेश राणेंनी जो मोर्चा काढला होता तो या 192 गावांसाठी होता. त्याचा राधानगरी अभयारण्य क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या 15 गावांशी कसलाही संबंध नव्हता. निलेश राणे समजत असलेली इकोसेन्सिटीव्हमधील गावे ही नाहीत याची त्यांनी अगोदर माहिती करून घ्यावी. निलेश राणेंनी आपल्या अज्ञानाचे सर्वांसमोर प्रकटीकरण करू नये. त्यांना आपल्या मतदारसंघाचा किती सखोल अभ्यास आहे हे सुद्धा यातून दिसून येते. प्रत्येक गोष्टीत ट्विटरवर टिव-टिव करण्याचे काम ते आजपर्यंत करत आले आहेत. मोठमोठया नेत्यांवर टीका करण्यात त्यांना धन्यता वाटते. निलेश राणेंकडून अभ्यासाची अपेक्षा नाहीच आणि त्यांच्यावर टीका करण्याइतकी त्यांची कुवत देखील नाही. परंतु त्यांनी अज्ञानातून केलेल्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील जनतेमध्ये गैरसमज पसरून सर्वत्र संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणून ही बाब उघडकीस आणत असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.