सिंधुदुर्ग - 'आज जे शिवसेनेला तालिबानी म्हणत आहेत, पण मुंबईत 1991 साली शिवसेना नसती तर... त्याच हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेने मुंबई वाचवली होती. हिंदू लोकांना वाचविले होते. आजही मुंबईच्या जनतेला माहिती आहे की शिवसेना नसेल तर मात्र मुंबईत हिंदुंचे, मराठी माणसांचे काही खरं नाही. त्यामुळे भाजपने शिवसेनेला तालिबानी संस्कृती म्हटले तरी जनता ही शिवसेनेच्या पाठीशी राहील', असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. तर 'गर्विष्ठ नारायण राणेंनाही शिवसेना प्रमुखांसमोर झुकावे लागले' असेही ते म्हणाले. कुडाळ येथे ते माध्यमांशी बोलत होते.
अनेक माना शिवसेना प्रमुखांसमोर झुकल्या
'खरंतर बाळासाहेबांच्या पुढे अनेक लोकांच्या माना झूकल्या. अनेक लोक नतमस्तक झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, प्रणव मुखर्जी असतील किंवा त्या वेळची ग्यानी झैलसिंग असतील. देवेंद्र फडणवीस यांचा बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी मोठा हातभार आहे हे आम्ही नाकारत नाही. देवेंद्र फडणवीस येणार म्हणून स्मारकाच्या ठिकाणी परवानगी दिली', असे नाईक म्हणाले.
म्हणून ठाकरे स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण...
'स्मारकाच्या ठिकाणी येऊन नारायण राणेंनी टीका करण्याचे काम केले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ते आवडले नाही. म्हणून त्यांनी गोमूत्र शिंपडले ते बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत', असे वैभव नाईक यांनी म्हटले.
पण नारायण राणेंची त्यावेळी येण्याची हिम्मत झाली नाही - वैभव नाईक
'बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळी देशातील लाखो जनता त्याठिकाणी आली होती. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, यांनी बाळासाहेबांचे अंत्यदर्शन घेतले. परंतु नारायण राणेंची त्यावेळी तिथे येण्याची हिम्मत झाली नाही. आज मात्र केंद्रीय मंत्रीपदाच्या पदराआड किंवा भाजपच्या पदराआड दर्शन घेतले. पण दर्शन घेताना सुध्दा त्यांना बाळासाहेबांचे विचार कधी समजले नाहीत. अशांना घेऊन भाजप वाढत असेल तर त्याचा लखलाभ भाजपला होवो. मात्र शिवसेना आजही ठामपणे उभी आहे आणि उद्याही राहील', असे वैभव नाईक म्हणाले.
नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा शिवसेनेवर टीका करण्यासाठीच - नाईक
'महाराष्ट्रात, कोकणात मोठ्या प्रमाणात पूर आला. लोकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी राणे आले आणि मला पंतप्रधानांनी पाठवलंय म्हणून सांगितले. पूरग्रस्ताना मदत करू म्हणाले. मात्र विमानतळावर उतरल्यापासून राणेंनी शिवसेनेवर टीका करण्याचे काम केले. राणे मदत करू म्हणाले. मात्र गेल्या दीड महीन्यात राणेंनी पूरग्रस्ताना दमडीसुद्धा दिली नाही. कोकणात एखादा नवीन प्रकल्प किंवा एखादी नवीन योजना आणण्याची घोषणातरी केली का? फक्त शिवसेनेनेवर टीका करण्यासाठीच ही जनआशीर्वाद यात्रा आहे का?', असा सवाल वैभव नाईक यांनी केला.
बागड्यांना सेनेवर आरोप करता यावेत म्हणून यात्रा - नाईक
'या यात्रेला लोकांचा आशिर्वाद मिळणार नसून लोकांचा आशीर्वाद राणेंनी दहा वर्षांपूर्वीच गमावला आहे. येथील आमदार आणि खासदार शिवसेनेचेच निवडून आलेत. त्यामुळे कोकणातील जनतेचा आशीर्वाद राणेंना मिळाला नाही आणि पुढच्या काळात सुद्धा तो मिळणार नाही. राणे भाजपच्या पदराआड राहून मोदीजींचं नाव सांगून शिवसेनेवर आरोप करण्यासाठी फिरत आहेत. भाजपच्या काही लोकांना अजूनही शिवसेना आणि भाजपने एकत्र यावे असे वाटते म्हणून भाजपचे नेते शिवसेनेवर आरोप करत नाहीत. मात्र अशा बाडग्यांना शिवसेनेवर आरोप करण्यासाठी ही जनआर्शीवाद यात्र आहे', असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.
जनआशीर्वाद घेण्यासारखा भाजपात कोणी थोर पुरुष नाही?
'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जगविख्यात थोर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढला. मात्र आताची भाजप बाळासाहेबांच्या शिवसेनेवरच आरोप करून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा नारायण राणेंनी विडा उचलला होता. काल त्याच नारायण राणेंनी बाळासाहेबांप्रती आदर भावना व्यक्त करून त्यांचा आशीर्वाद घेतला. खरंतर आशीर्वाद घेण्यासारखा भाजप पक्षात कोणी थोर पुरुष आहे, असे राणेंना वाटत नाही. त्यामुळेच त्यांना बाळासाहेबांच्या समोर नतमस्तक व्हावे लागले. वस्तुस्थिती पाहता नारायण राणे आता बाळासाहेबांबद्दल कितीही आत्मियतेची भावना व्यक्त करत असले तरी बाळासाहेब हयात असताना त्यांना त्रास देण्याचेच काम नारायण राणेंनी केले', असेही नाईक म्हणाले.
राणेंनी सावरकरांवरही टीका केली - नाईक
'त्याचप्रमाणे थोर पुरुष असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याचे काम राणेंनी केले. मात्र शिवसेनेने या थोर पुरुषांचा आदर्श घेऊन काम केले. राणे ज्या मुंबई महानगरपालिकेवर आरोप करत आहेत, त्याच मुंबई महानगरपालिकेने ही दोन्ही स्मारके उभारली आहेत. त्यामुळे एकेकाळी या थोर पुरुषांवर टिका करून पुन्हा त्यांच्याच पायावर नाक घासण्याची राणेंनी संस्कृती सर्वश्रुत आहे', असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.
हेही वाचा- रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली, राहुल गांधींबद्दल केले 'हे' विधान