सिंधुदुर्ग - प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना चौकशी समितीने क्लीनचिट दिली असली, तरी जनतेच्या नजरेत त्या दोषीच आहेत. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. तर प्रांताधिकाऱ्यांची चौकशी करणाऱ्या चौकशी समितीच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
संजय पडते यांनी आपल्या मागणी पत्रात म्हटले आहे, की खरमाळे या कुडाळ उपविभागीय अधिकारी (प्रांत), या पदावर कार्यरत असून त्यांच्या कामाबाबत लोकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. त्या प्रशासकीय कामात निर्दोष असल्या तरी जनतेच्या दृष्टीने दोषी आहेत. त्यामुळे त्यांची तातडीने बदली व्हावी, अशी मागणी आहे. त्यांची बदली झाल्यास लोकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर प्रशासकीय कामामध्ये पारदर्शकता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रांताधिकारी खरमाळे यांच्यावर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या मालकांना शासनाने मंजूर केलेला मोबादला देण्यासाठी कुडाळ प्रांताधिकारी पैसे मागीत असल्याचा आरोप आ. वैभव नाईक यांनी केला होता. त्यानंतर ३० जून रोजी कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी चौकशी करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली होती. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी २ जुलै रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भू-संपादन अधिकारी वर्षा सिंगन, जिल्हाधिकारी कार्यालय लेखाधिकारी नितिन सावंत यांची समिती नियुक्त केली होती.
त्यापूर्वी खरमाळे यांना २ जुलै रोजी ३० जुलैपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविले होते. यानंतर त्याची चौकशी झाली. त्यात त्यांना क्लीन चिट देण्यात आली. यामुळे शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. दरम्यान चौकशी समितीने प्रांत कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात क्लिनचीट देऊन प्रांताना पुन्हा कुडाळ कार्यालयातच हजर होण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असं करून या प्रकरणी हायवे बाधितांचा भ्रम निराश केला असून भ्रष्टाचारी अधिकार्यांना पाठीशी घालण्याचे काम चौकशी समितीने केले आहे. त्यामुळे या चौकशी समितीची चौकशी करण्यात यावी आणि नव्याने कुडाळ प्रांताधिकारी यांचीही चौकशी व्हावी. ही कारवाई १३ ऑगस्ट २०२० पूर्वी करावी. अन्यथा १५ ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे कुडाळ तालुका अध्यक्ष भास्कर परब, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी जाहीर केले आहे.