सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील सावंतवाडी हे शहर लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. सावंतवाडीतील चितारआळी भागात अतिशय सुंदर आणि हुबेहुब फळे आणि भाज्यांच्या लाकडाच्या प्रतिकृती बनवल्या जातात. आता हीच लाकडी खेळणी भारतीय टपाल खात्याच्या पोस्ट कार्डवर झळकली आहेत. टपाल खात्याच्या दीडशे वर्षांच्या प्रवासानिमित्त खास पोस्ट कार्ड काढण्यात आली आहेत. ही कार्ड ग्रीटिंग स्वरुपात पाठवता येणार आहेत. भारतीय पोस्टाने देशातील बारा हस्तकलांसोबत सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांना पोस्टकार्डवर स्थान दिल्याने सिंधुदुर्गच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे.
जागतिक पोस्टकार्ड दिनाचे औचित्य साधून १ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील मुंबई व गोवा येथे नव्या पोस्टकार्डचे प्रकाशन झाले. यावेळी गोवा येथील पोस्ट मास्तर डॉ. एन. विनयकुमार, डॉ. सुधीर जखेरे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा झाला. यावेळी या कार्डांचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशची वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेला या पोस्टकार्डमध्ये स्थान दिले आहे.
सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांनी सावंतवाडीतील या लाकडी खेळण्यांना व कारागिरांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर शिवरामराजे भोसले यांनीही चितारी कारागिरांना राजाश्रय मिळवून देताना ही कला सातासमुद्रापार पोहोचवली. राजमाता कै. सत्वशीलादेवी भोसले यांनीही लाकडी खेळण्यासोबत गंजिफा कलेला नवी ओळख दिली. गेली कित्येक वर्षे सावंतवाडी चितारआळीतील लाकडी खेळणी देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे या लाकडी खेळणी बनवण्याचे अनेक कारखाने आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक ही लाकडी खेळणी खरेदी करतात.
या नव्या कार्डांमध्ये सावंतवाडीव्यतिरिक्त आंध्रप्रदेशची कोंडापल्ली, एटीकोप्पका खेळणी, गुजरात कच्छ येथील लाकडी खेळणी, हिमाचलमधील हिमाचली बाहुल्या, मध्यप्रदेशची बुधनी खेळणी, ओडिशाची जोखंढेई लाख खेळणी, तामिळनाडूची तंजावूर खेळणी, तेलंगणाची निर्मल खेळणी, कर्नाटकची छन्नपटना आणि उत्तरप्रदेशची मिर्झापूर बनारसी खेळणी यांचे फोटो पोस्टकार्डवर आहेत. भारतीय पोस्टाने प्रकाशित केलेली ही कार्ड आपण मित्र-मैत्रीण व नातेवाईकांना भेट स्वरुपात पाठवू शकणार आहे. त्यामुळे ही कला आता देशभर जाणार आहे.
हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या वॉटर एटीएम प्रकल्पाचे लोकार्पण