सिंधुदुर्ग - जिल्हाधिकारी यांच्या सभेचे इतिवृत्त सरसकट रद्द करण्यावरुन आणि गणेशोत्सवादरम्यान गावात येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रश्नावरुन सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी शिफारस केलेल्या नियमांचे इतिवृत्त सरसकट रदद् करू नये, अन्यथा सरंपच ग्राम कमिटीचे सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे.
कोरोनाच्या संकटात गावात आलेल्या आणि येऊ पाहाणाऱ्या तसेच आगामी कालावधीत गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी गावातील नियंत्रण समिती, अध्यक्ष असलेले सरपंच तत्पर आहेत.
दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या सभेत शिफारस केलेल्या निर्णयाला सरपंचांची तत्वतः मान्यता आहे. सरपंच संघटनेची तशी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही झाली आहे. मात्र, झालेल्या शांतता समितिच्या बैठकीत हे इतिवृत्त सरसकट रदद् करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील सरपंचांशी चर्चा केल्याशिवाय असे कोणतेही निर्णय घेतल्यास आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा सरपंच संघटनने दिला आहे. यासाठी वेळप्रसंगी राजीनामाही देऊ, असेही सरपंच संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - 'गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना जिल्हाबंदीचे आदेश नाहीत'
गणेशोत्सवासाठी गावात येणाऱ्या लोकांवर निर्बंध असणे आवश्यक आहे. अन्यथा गावागावात भांडणे होतील. याची जबाबदारी कोण घेणार ते संबंधितानी स्पष्ट करावे, सरपंच म्हणून आम्हाला प्राप्त असणारी कर्तव्ये आम्ही निश्चितच पार पाडून शासनाला सहकार्य करु, तसेच पालकमंत्री यांनी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सवास कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची काळजी घेण्यासाठी प्रशासनाला शेवटी ग्रामीण पातळीवर ग्राम नियंत्रण समितीचे सहकार्य लागणार आहे. त्यामुळे सरपंचांशी चर्चा करून मगच नियमावली तयार करावी, अशी मागणी करण्यात आली असल्याची माहिती सरपंच संघटना सरचिटणीस दादा साईल यांनी दिली.