सिंधुदुर्ग - तळकोकणात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका इथल्या भात शेतीला बसला आहे. मुसळधार पाऊस आणि निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शेकडो हेक्टर वरील पीक आडवे झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
भात हे कोकणातील प्रमुख धान्य पीक आहे. दरवर्षी शेकडो हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. गेली काही वर्षे अवकाळी पावसाचा फटका भात पिकाला बसत होता. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसला आहे. सुमारे ९९७५ हेक्टर भात शेती अतिवृष्टीमुळे उद्धवस्त झाली आहे. यात २८ हजार ७६० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २३८ गावातील शेतकऱ्यांची भातशेती अतिवृष्टीमुळे पूर्णपणे बाधित झाली आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती मुळे हाता तोंडाशी आलेले पीक आडवे झाले.
दरम्यान, पूर ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यात तळकोकणात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसल्याचे समोर आले आहे. खरीप हंगामातील भात पीक उध्वस्त झालेले आहे. तर पडझडीमुळे आंबा, काजू, नारळ, फणस, पोफळी आदी फळझाडांचे देखील नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ७६००० हेक्टर क्षेत्र लागवडी खाली असून त्यातील ९९७५ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे.