सिंधुदुर्ग - आनंद साजरा करावा पण त्याला काही मर्यादा आहेत, यात्रा लोकांच्या समृद्धीसाठी असली पाहिजे, असे मत शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. नारायण राणे यांच्या जामिनावर हायकोर्टामध्ये १७ सप्टेंबर सुनावणी होणार आहे, यानंतर जर त्यांची टीका करण्याची भूमिका बदलली नाही, तर आम्ही राजकीय संघर्ष करायला तयार आहोत, असा थेट इशारा शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राणेंना दिला आहे.
'राणेंच्या विरोधात माझा राजकीय संघर्ष अटळ' -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी, अन्यथा जिल्ह्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांच्याविरोधात माझा राजकीय संघर्ष अटळ आहे, असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिला. दरम्यान याबाबतची भूमिका आपण १७ तारखेनंतर स्पष्ट करणार आहे. मात्र, कोरोना संकटात राणेंकडून जन आशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणे हे येथील जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, असेही ते यावेळी म्हणाले. याबाबत त्यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
१७ तारखेनंतर आपली भूमिका जाहीर करणार -
केसरकर पुढे म्हणाले 'सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणची शांतता अबाधित राहणे गरजेचे आहे. या शांततेचा कोणी भंग करत असेल, तर पुन्हा एकदा मी राजकीय संघर्षासाठी तयार आहे. मात्र, माझा राजकीय इतिहास हा रक्तरंजित नाही. त्यामुळे नीती तत्वाच्या आधारे तो संघर्ष मी करेन, असे त्यांनी सांगितले. दरम्यान याबाबत आपण १७ तारखेनंतर आपली भूमिका जाहीर करणार आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - परिवहन मंत्री अनिल परबांना ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणाले- क्रोनोलॉजी समजून घ्या...