सिंधुदुर्ग - स्वॅब तपासणीसाठी आवश्यक असलेली RTPCL मशीन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असताना पालकमंत्र्याकडून १ कोटी मंजूर केल्याचे सांगून दिशाभूल केली जात आहे. मुळात माकडताप तपासणी लॅबसाठी आलेली मशीन सर्व आजाराच्या स्वॅबची तपासण्या करू शकते, ही माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाल्याचा गौप्यस्फोट भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.
राजन तेली म्हणाले, कोव्हिड लॅब संदर्भात पालकमंत्री विरोधी पक्ष राजकारण करत असल्याची टीका करतात. मात्र, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी माहितीच्या अधिकारात माहिती दिली आहे. त्यामध्ये RTPCL मशीन जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रयोगशाळेत उपलब्ध आहे. अन्य काही उपकरणे मिळताच येथे स्वॅब तपासणी होऊ शकते. ही माहिती मी नाही तर, जिल्हा प्रशासन स्वतः माहितीच्या अधिकारात मला दिली आहे. ही मशीन जिल्हा रुग्णालयाच्या आवारात १३ ऑगस्ट २०१९ ला आली आहे. मानवी विषाणू तपासणी या मशीनवर होऊ शकते. त्यामुळे पालकमंत्री ही मशीन सुरु करण्याचा प्रयत्न न करता पुणे, मिरज येथे स्वॅब पाठवून लाखो रुपयांचा चुराडा करत असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनसाठी ३३ कोटी निधी आहे. त्यामधील २५ टक्के निधी कोविडसाठी खर्च करायचा आहे, आतापर्यंत जिल्ह्यात ५६ कोरोना रुग्ण आहेत. आणखी किती वाढतील सांगता येत नाही, असे राजन तेली म्हणाले. कोरोना महामारी असताना आरोग्य विभागात २६४ पदे रिक्त आहेत. हिवताप व जिल्हा परिषद आरोग्य सेवक पुरुष ४५, आरोग्य सेविकांची ५० पदे रिक्त आहेत. फार्मासिस्ट ३३ व एमपीडब्लू ३३ पदे रिक्त आहे. प्राथमिक रुग्णालयात १४ वैद्यकीय अधिकारीपदे रिक्त आहेत. कोविड १९ साठी नव्याने पदे मागण्यापेक्षा पालकमत्र्यांनी ही पदे भरावीत, अशी मागणी राजन तेली यांनी केली.
खासदार,आमदारांना काय वाटते? त्यापेक्षा पदे मंजूर करून घ्या. माकडताप तपासणी लॅबसाठी आलेली मशीन स्वॅब तपासणी करू शकते. स्वॅब तपासणी करण्यासाठी या मशीनचा उपयोग करता आला असता. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असा टोला राजन तेली यांनी उदय सामंत यांना लगावला.