सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून अनेक भागात पाणी घुसले आहे. कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी, देवगड, कणकवली या भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कुडाळ येथील भंगसाळ नदीला मोठा पूर आल्यामुळे पुराचे पाणी वस्त्यांमधे घुसून त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. लक्ष्मीवाडीच्या काळप नाका येथील एका घराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. यावेळी घरात अडकलेल्या कांबळी कुटुंबातील पाच जणांना व तीन श्वानांना कुडाळ पोलिसांच्या रेस्क्यू टीमने बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
सावंतवाडी-मळगाव घाटात रस्त्यावर मोठे झाड पडल्याने काही काळ एकेरी मार्गाने वाहतूक सुरू होती. काही तासांनी प्रशासनाने झाड हटवल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. दांडेलीतील वरचावाडा येथून वस्तीत जाणाऱ्या रस्त्यावर काजूचे झाड विद्युत तारांवर कोसळल्याने ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. न्हावेली टेंबवाडी येथेही एका घराच्या आंब्याचे झाड कोसळले. त्यामुळे घरगुती साहित्याचे नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीला पूर आल्यामुळे अनेक गावांना याचा फटका बसला. येथील केळी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. देवगड आणि कणकवलीलाही पुराचा फटका बसला.
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. 4, 5 व 6 ऑगस्टला मुंबई, पालघर, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.