सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आज अखेर ९८ टक्के ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे यंदाचे अर्धे अधिक शैक्षणिक वर्ष घरीच गेले. कोविडच्या काळात ऑनलाईन धडे घेणारे विद्यार्थी आता वर्गात आपल्या शिक्षकांसमोर बसून शिकत आहेत. या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या शिक्षकांशी संवाद साधला असता 'गड्या आपली शाळाच बरी' असा सूर विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला आहे. ऑनलाईन शिक्षणातील अनेक अडचणी यावेळी विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत.
ऑनलाईन शिक्षणातल्या अडचणी
कासार्डे माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला. यावेळी कासार्डे येथील सिलिका खाणीवर काम करणाऱ्या एका खाण कामगाराची मुलगी असलेल्या सोनू राजू पवार या विद्यार्थिनीने सांगितले की, आमच्या घरी एकच अँड्रॉइड मोबाईल आहे. माझा भाऊ आणि मी एकाच वर्गात शिकतो. दिवसभर वडील कामानिमित्त बाहेर असतात. ते घरी आले की आम्हाला मोबाईल मिळायचा. काही वेळा मोबाईलला नेट मिळायचे नाही त्यावेळी अडचण व्हायची. काही वेळा वडील उशिरा घरी आले तर रात्री जागून अभ्यास करावा लागायचा. परंतु, मला वर्गात बसून शिकायला आवडते. कारण वर्गात एखादी शंका असल्यास शिक्षकांना विचारता येते, असे ती म्हणाली. कोविडच्या भीतीने आई-वडील शाळेत पाठवायला तयार नाहीत. त्यांचे मन सारखे बदलत असते. परंतु, आम्हाला शिकायचे आहे, असेही तिने सांगितले.
श्रुती वरुणकर या विद्यार्थिनीने सांगितले आमच्या घरात एकच मोबाईल आहे त्यावर चार जणांचा अभ्यास यायचा. प्रत्येकाला वेळच पुरायचा नाही. अनेक वेळा लेक्चर्स चुकायची. नेटवर्कची अडचण असल्यामुळे काहीवेळा शिक्षक नेमके काय शिकवतात, हेच समजायचे नाही.
शिक्षक पांडुरंग काळे म्हणतात, पालकांजवळ एकच मोबाईल असतो. दिवसभर हे पालक बाहेर असतात त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. समोरासमोर शिक्षण हे अतिशय चांगले आहे. एखादा घटक विद्यार्थ्यांना समजला नाही तर, समोरासमोर समजावून देता येतो. ऑफलाईन शिक्षणात मूल आणि शिक्षकांना जो आनंद आहे, तो ऑनलाईन शिक्षणात नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - उजनी काठावर फ्लेमिंगोची मांदियाळी, पक्ष्यांच्या लवकर आगमनाने संकटाची चाहूल
९ वी ते १२ वी वर्गांमध्ये शिकतात ४२ हजार विद्यार्थी
जिल्ह्यात सध्या सर्वच शाळा कोविडच्या निमित्ताने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत असून पुन्हा एकदा शाळा गजबजू लागल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २४७ माध्यमिक शाळा असून सुमारे २ हजार २०० शिक्षक, ९०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच, ९ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गांमध्ये ४२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड-१९ ची चाचणी करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोविड-१९ टेस्ट शासकीय रुग्णालयामार्फत करण्यात आली आहे. या चाचण्यांविषयीचे नियोजन जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले होते. प्रमुख्याने ४० वर्षावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मधुमेह, रक्तदाब, अस्थमा, गंभीर आजार यासारखे आजार असतील तर त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आली. तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आली.
हेही वाचा - अनाथांची माता 'अनुराधा' पोहचल्या 'कोन बनेगा करोडपतीच्या स्टेजवर'