सिंधुदुर्ग - मुंबईतून गाड्यांच्या ताफ्यासह कोकणात जात जिल्हाभर लवाजम्यासह मनसोक्त फिरणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यावर कोकणातून टीकेचे मोहोळ उठले आहे. अनेक लोकांनी त्यांच्या या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. हे सत्ताधारी नेते स्वतःला हवे तेव्हा हवे तसे नियम डावलणार असतील, तर सगळे कठोर नियम फक्त मुंबईत लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या सामान्य कोकणवासीयांसाठीच आहेत का? त्यांच्यासाठीच हा वेगळा न्याय का? अन्याय करण्यासाठी या सरकारने जाणीवपूर्वक कोकणी माणूसच निवडला आहे का? हे खास "दार" कोकणात येण्यासाठी अक्षरश: तडफडणाऱ्या सर्वसामान्य कोकणी चाकरमान्यांसाठी का उघडत नाहीय?" अशा संतप्त सवालांच्या फैरीच भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊतांवर झाडल्या आहे.
मुंबईतून कोकणात येणाऱ्या लोक प्रतिनिधींना वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगराणीखाली पाच दिवस 'होम क्वारंटाइन' राहणे आवश्यक असल्याचे शासकीय निर्देश आहेत. मात्र, त्याची ऐसी की तैसी करत राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे मुंबईहुन सहा गाड्यांचा ताफा घेऊन सिंधुदुर्गात पोहोचले, एवढेच नव्हे तर ते लवाजम्यासकट कोकणात बैठका घेत फिरले असल्याच्या चर्चेनंतर जनमानसात संतापाची भावना उसळली. शासकीय निर्देश डावलत खासदारांनी स्वतः होम क्वारंटाइन न होता बैठका घेण्याचे सत्र आरंभल्यानंतर जिल्हाभरात अनेकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपा नेते प्रमोद जठार यांनी कडक शब्दात खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना म्हटले आहे, की ठाकरे सरकारने कितीही ओरडून सांगितले, तरी कोकणातील मुंबईकरांसाठी दिलेल्या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. मुंबईत कोकणी माणूस लॉकडाऊनच्या हालअपेष्टांमध्ये प्राणांतिक त्रासला आहे. सगळ्या व्यवस्थांचा मुंबईत साफ बोजवारा उडालेला आहे. आधीच खडतर असलेले कोकणी माणसाचे मुंबईतले जीवन आतातर अगदीच असह्य झाले आहे. अनेक गैरसोयींमुळे त्याचा संयम सुटत चाललेला आहे. आजही कोकणी माणसांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. अशा भागात कोरोनाचा प्रसार फारसा नाही, पण अन्य विभाग व झोपडपट्टी भागातून तिथे रुग्ण आढळत आहेत. कोकणवासीय विचित्र सापळ्यात अडकले आहेत. अशा परिस्थितीत दुर्दैवाने महामारी अधिक फैलावून "मुंबईत आमचे काही बरे-वाईट झाले तर आम्हाला पाहायला देखील कोणी असणार नाही. आमच्याकडे पैसे नसतील तरी गावाकडे पेजभात खाऊन देखील गावच्या वातावरणात अधिक सुरक्षित राहू, अशा काकुळतीच्या भावना कोकणी जनता व्यक्त करत आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे सहकार्य करत आवश्यक त्या सर्व आरोग्य तपासण्या करून घेण्याची व गावी जाऊन क्वारंटाइन होऊन राहण्याची त्यांची पूर्ण मानसिकता व तयारी आहे. गावाकडची अनेकांची घरे आज कुलूपबंद असल्याने त्याचीही फारशी अडचण होणार नाही, असे या कोकणी जनतेचे म्हणणे आहे.
मुळात, मुंबईत आणि कोकणात जी शिवसेना वाढली तीच चाकरमान्यांच्या जीवावर, पण आज जेव्हा चाकरमान्यांचा जीव वाचवायची वेळ आली, तेव्हा त्यांच्यासोबत कोणी उभे राहताना दिसत नाही. कोकणी जनता संकटात असताना तिला वाऱ्यावर सोडून आपण तेवढे कार्यकर्त्याना घेऊन कोकणभर फिरायचे हि कसली राऊतांची रीत? असेही जठार म्हणाले. कोकणात गरज नसताना फिरून आपण किती कर्तव्यदक्ष आहोत हे दाखवण्यासाठी तिथे वृथा आटापिटा करू नये. त्याऐवजी मुंबईतल्या कोकणी माणसाच्या स्थलांतरासाठी तातडीने पावले उचलावीत, असे प्रमोद जठार यांनी म्हटले आहे.