सिंधुदुर्ग - जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना मुंबई वरून येणारे काही चाकरमानी प्रत्येक स्टेशन वरून छुप्या मार्गाचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. सद्यस्थितीला जिल्हा रेड झोन मध्ये असताना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र यापासून स्वतःची सुटका व्हावी म्हणून चाकरमानी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत असल्याचं निदर्शनात येत आहे.
अँटीजेन रॅपिड टेस्ट चुकविण्यासाठी छुप्या मार्गाचा वापर..
सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोन मध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सार्वजनिक ठिकाणी अँटीजेन रॅपिड टेस्ट केली जात आहे. विशेष म्हणजे मुंबईतून येणारे सर्वच चाकरमानी यांची टेस्ट केली जात आहे. तसेच जिल्ह्याच्या प्रत्येक शहरात सुद्धा अँटीजेन रॅपिड टेस्ट केली जाते. परंतू काही नागरिक कोविड टेस्ट चुकविण्यासाठी अनेक छुप्या मार्गांचा वापर करत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्टेशन मधील अँटीजेन रॅपिड टेस्ट चुकविण्यासाठी छुप्या मार्गाचा लोक वापर करत असल्याचं निदर्शनास आले आहे. अशा मार्गाचा वापर करून हे सर्व चाकरमाने आपल्या गावापर्यंत पोहोचत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र यावर प्रशासनाचा कोणताच अंकुश नसल्याचं समोर वास्तव उघड होत आहे. अशा लोकांना शोध घेऊन प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
सिंधुदुर्गात आतापर्यंत 713 जणांचा कोरोनाने मृत्यू..
जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट 22 टक्के पेक्षा जास्त आहे. तर मृत्यूदर दोन टक्के पेक्षा अधिक आहे. सद्यस्थितीला पॉझिटिव्ह रुग्ण 28 हजार 272 आहेत. तर सक्रिय रुग्ण पाच हजार 846 आहेत. आतापर्यंत झालेले मृत्यू 713 आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात असताना काही लोक मात्र बेकायदेशातीर मार्गाचा अवलंब करत प्रशासनाच्या नियमांना हरताळ फासताना दिसत आहेत.