सिंधुदुर्ग - जिल्ह्यात चाकरमानी येण्याचा ओघ आता कमी झाला आहे. १३ ऑगस्टपासून बसने एकही चाकरमानी दाखल झालेला नाही. कोरोना चाचणी अनिवार्य असल्याचा परिणाम दिसून येत असून १२ ऑगस्टपर्यंत ४ हजार २०० चाकरमानी बसने दाखल झाले आहेत. दरम्यान, परतीच्या प्रवासासाठी बसने आरक्षणाला सुरुवात केल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली आहे, तर जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना दहा दिवस ‘होम क्वारंटाइन’ची १२ ऑगस्टपर्यंत दिलेली मुदत संपली आहे. या १२ दिवसात जिल्ह्यात विविध वाहनांनी ३५ हजार चाकरमानी दाखल झाले आहेत.
सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ३४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. सावंतवाडी आगारातून ७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये सावंतवाडी-तळेरे मार्गे बोरिवली सायंकाळी ४ वाजता, सावंतवाडी-तळेरेमार्गे मुंबई ४.३० वाजता, सावंतवाडी तळेरेमार्गे ठाणे ५ वाजता, दोडामार्ग तळेरेमार्गे बोरिवली ६ वाजता, बांदा-बोरिवली ४.३० वाजता, सावंतवाडी कापसीमार्गे निगडी ७ वाजता, दोडामार्ग बांदा कापशीमार्गे निगडी सायंकाळी ५ वाजता सोडण्यात येणार आहे.
मालवण आगारातून ५ गाड्या सोडण्यात येणार आहेत. यात मालवण सायनमार्गे बोरिवली सायंकाळी ४.३० वाजता, मालवण सायनमार्गे मुंबई ५ वाजता, मालवण बोरिवलीमार्गे विरार ३ वाजता, आचरा सायनमार्गे बोरिवली ५ वाजता तर मालवण फोंडामार्गे निगडी सायंकाळी ६ वाजता सोडण्यात येणार आहे.
कणकवली आगारातून ८ गाड्या सोडण्यात येतील. यात कणकवली सायनमार्गे बोरिवली ४.३०, कणकवली सायनमार्गे मुंबई ४ वाजता, कणकवली पनवेलमार्गे ठाणे ६ वाजता, खारेपाटण पनवेलमार्गे बोरिवली ५ वाजता, तळेरे पनवेलमार्गे बोरिवली ५ वाजता, वैभववाडी-बोरीवली ५.३०, वैभववाडी-मुंबई सायंकाळी ६ तर फोंडा पनवेलमार्गे बोरिवली ही गाडी सायंकाळी ५ वाजता सोडण्यात येणार आहे.
देवगड आगारातून ५ गाड्या सोडण्यात येतील. त्यामध्ये देवगड तळेरेमार्गे बोरिवली ३.३०, जामसंडे -बोरिवली ५ वाजता, तळेबाजार- बोरिवली ५.३०, शिरगाव-बोरिवली ६ वाजता, देवगड तळेरेमार्गे कुर्ला नेहरूनगर ४ वाजता, देवगड गगनबावडामार्गे वल्लभनगर ही गाडी रात्री ८ वाजता सोडण्यात येणार आहे . विजयदुर्ग तळेरेमार्गे बोरिवली ४ वाजता तर विजयदुर्ग तळेरेमार्गे मुंबई गाडी ३ वाजता सोडण्यात येईल.
कुडाळ आगारातून ४ गाड्या सोडण्यात येतील. यात कुडाळ तळेरेमार्गे बोरिवली गाडी सायंकाळी ४ वाजता, कसाल बोरिवली ४.३०, सिंधुदुर्गनगरी बोरिवली ४.३०, कुडाळ फोंडामार्गे निगडी ही गाडी रात्री ८.३० वाजता सोडण्यात येणार आहे. वेंगुर्ला आगारातून वेंगुर्ला तळेरेमार्गे बोरिवली सायंकाळी ४ वाजता व शिरोडा तळेरेमार्गे बोरिवली सायंकाळी ४ वाजता सोडण्यात येणार आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली.
परतीच्या वाहतुकीकरिता गट आरक्षण केल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट मुंबई, उपनगर, पुणे तसेच राज्यातील अन्य ठिकाणी बस सोडण्यात येणार आहेत. एखाद्या गावातील २२ प्रवाशांनी राज्यात कुठेही जाण्याकरिता व परत येण्याकरिता गाडीची मागणी केल्यास त्यांना तशी सुविधा पुरविण्यात येणार आहे.
दरम्यान, सध्या जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ कमी झाला असला तरी १२ ऑगस्टनंतर येणाऱ्यांना कोरोना टेस्ट करून येणे बंधनकारक असल्याने ज्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आहे, त्यांनाच एसटी बसमधून प्रवास करता येणार आहे. मात्र, जर एकाच घरातील अनेक जण येणार असतील तर टेस्टचा खर्चही वाढतो, शिवाय रिपोर्ट मिळायला वेळ जातोच, त्यामुळेच प्रवाशांनी १२ ऑगस्टनंतर एसटीने येणे बंद केले आहे.