सिंधुदुर्ग - जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, हा मार्ग धोकादायक बनला असल्याचा आरोप मनसे राज्य सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ठेकेदाराने आपले 800 कोटींचे टेंडर 2 हजार कोटींवर नेले आणि त्याला सरकारची मंजुरी मिळवली. मात्र, अजून महामार्गबाधित शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळालेली नाही. सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याचेही परशुराम उपरकर म्हणाले. कोकणातली कुंभारी माती भरावाला चालत नाही, असे आम्ही वारंवार सांगत असतानाही कोणी ऐकले नाही. आता त्यामुळे पहिल्या पावसात अनेक ठिकाणी भराव वाहून गेला आहे. असा भराव रात्रीच्या वेळी वाहून गेला तर सावित्री नदीची आठवण झाली असती, असेही ते म्हणाले. महामार्गाच्या उभारलेल्या पुलाच्या ब्लॉकमधून कारंज्यासारखं पाणी उडत आहे. आशा पद्धतीतला रस्ता 50 वर्ष टिकणार कसा? पहिल्या वर्षी डागडुजी करावी लागत असेल, तर त्याचा दर्जा काय असेल? असे प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले.
केंद्र सरकारच्या एजन्सी आणि बंधकाम विभाग ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेत नाही. सर्व्हिस रस्त्यांवर पाणी तुंबत आहे. रस्त्याच्या कडेचे गटार निकृष्ठ असून, अनेक गाड्या गटारात गेल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ठेकेदार लोकांच्या जमिनीचे पैसे दिलेले नसताना पोलिसांकडून दमदाटी करून अतिक्रमण करत आहेत. याला जनतेने विरोध करावा मनसे त्यांच्या पाठीशी आहे. मनसे लवकरच याबाबत आंदोलन उभं करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.