सिंधुदुर्ग - ढगफुटी झाल्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटणील नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी लगतच्या शेतांमध्ये घुसल्याने भातशेती तसेच भाजीपाला शेतीवर मातीचा गाळ पसरला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आठवडाभर सुरू असणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी खारेपाटण परिसरातील चिंचवली, तिथवली ,दीक्षित, शेरपे गंगावणे, नडगिवे, वाईंगणी भागात सुमारे पाच तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. खारेपाटण व आजूबाजूच्या परिसरात मोठा पाऊस झाल्याने सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने मोठा परिसर जलमय झालाय. यामुळे शेती आणि भाजीपाल्याला देखील फटका बसलाय.
पावसामुळे खारेपाटण बाजारपेठ जलमय झाली असून मुख्य मार्गावर पाणीच पाणी झाल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले होते. पावसाचा जोर कायम असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता. तर विक्रीसाठी आलेल्या मालाला ग्राहकच नसल्याने शेतकऱ्यांप्रमाणे व्यापारीही चिंतेत आहेत. कोरोनामुळे गेले दहा दिवस व्यापारी पेठ बंद होती. पाऊस थांबत नसल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे.