सिंधुदुर्ग - बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली येथे एकाला अटक करण्यात आले आहे. त्याच्याकडून तीन लाखांच्या दारुसह तब्बल सव्वासहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. गोपाळ सुरेश गावडे (वय.३२ रा.चौकुळ नेनेवाडी) असे त्याचे नाव आहे.
शनिवारी रात्री आंबोली तपासणी नाक्यावर ड्युटी बजावत असलेल्या हवालदार दत्ता देसाई यांनी सावंतवाडीहून अंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या एका आयशर टेम्पोला तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित चालक गाडी तशीच पुढे घेऊन गेला. त्यामुळे गाडी थांबून तपासणी केली असता, गाडीत तब्बल तीन लाख रुपये किंमतीची दारू आढळून आलेली आहे. याप्रकरणी गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस सहाय्यक निरीक्षक नितीन नरळे, उपनिरीक्षक जयराम पाटील, हवालदार दत्ता देसाई, आत्माराम मेस्त्री, गजानन देसाई आदींनी केली. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी या टीमचे कौतुक केले. यावेळी दीपक सुतार सतीश कविटकर आदी उपस्थित होते.