सिंधुदुर्ग - येथील RPD महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी "93-95 RPD कॉलेज" नावाच्या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या एका अंध व आर्थिकदृष्ट्या मागे पडलेल्या वर्गमित्राला मदत केली आहे.
आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात माणसाची मनोवृत्ती यांत्रिक व संकुचित होत चालली आहे. मी कसा अधिकाधिक सुखी होईन या विचारात भौतिक सुखाच्या मागे धावताना दिसत आहे. यामुळे माणसातील माणुसकी कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये नोकरी- व्यवसाय किंवा लग्न झाल्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुरावलेली अनेक मित्र मंडळी व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली गेली आहेत.
असाच एक "93-95 RPD कॉलेज" नावाचा व्हाट्सएप ग्रुप सिंधुदुर्गात कार्यरत आहे. यामध्ये सर्व वर्गमित्र सदस्य आहेत. ग्रुपची निर्मिती झाल्यानंतर सर्वांनी प्रथम एकमेकांची विचारपूस केली. मात्र, आपला एक वर्गमित्र संजय लोणकर व्हॉट्सएप ग्रुपमध्ये नसल्याचे काहींच्या लक्षात आले. त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता तो सांगेली गावात माध्यमिक विद्यालयासमोर छोटीशी टपरी चालवत असल्याचे समजले आणि यातूनच तो आपला चरितार्थ चालवत असल्याचे कळाले. शारीरिक व्यंग आणि गरिबीमुळे तो आर्थिकदृष्ट्या मागे पडला आहे, अशी माहिती ग्रुपमधील मित्रांना समजली.
त्यामुळे सर्व मित्रांचे दातृत्व जागे झाले आणि प्रत्येकाने आपआपल्या परीने अंध संजय लोणकर यांना मदत केली. ज्या शाळेबाहेर लोणकर यांची टपरी आहे, त्या शाळेतील सध्याच्या शिक्षकांसह सर्वांनी मदतीचा ओघ सुरू केला. काहींनी लोणकर यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील उचलली आहे. त्यांनतर एक छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला. यावेळी सर्व ग्रुप सदस्य सवंगड्यांनी जमलेली मदत आपल्या सुदाम्याकडे सुपूर्द केली. त्यामुळे संजय लोणकर यांना आयुष्यातील संकट काळी मित्रांचा आधार मिळाला आहे.