सिंधुदुर्ग - जिल्ह्यात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. अनेकांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. या श्वानांच्या बंदोबस्तासाठी आता नसबंदीची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. भटक्या श्वानांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कणकवली नगरपंचायतीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. यासाठी नगरपंचायतीच्या वतीने उपाय योजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नगरपंचायतीच्या वतीने श्वानांची नसबंदी करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागवणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवली शहरातील भटके श्वान पकडून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे टेंडर येत्या ५ दिवसांत काढलं जाईल. शासनाचे नियम पाळून ही प्रक्रिया होईल. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार आम्ही यासाठी काही संस्थांशी सपर्क साधला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
नसबंदीमुळे श्वानांच्या उत्पत्तीला आळा
भटक्या श्वानांची नसबंदी करून त्यांना ज्या परिसरातून पकडण्यात आले आहे, त्या परिसरात पुन्हा सोडण्यात येणार आहे. नसबंदीसाठी पकडलेल्या श्वानांना ठेवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या वतीने मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हंटले. नसबंदी केल्याने कणकवलीत भटक्या श्वानांच्या उत्पत्तीला आळा बसेल, त्याचा परिणाम दोन वर्षानंतर दिसून येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी देखील सूचना देण्यात आल्या आहेत. या जनावरांना पकडून गोपुरी आश्रम येथील कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.