सिंधुदुर्ग - राज्य शासनाने 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अंतर्गत करोडोची गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर केले. यात कोकणात 77 टक्के गुंतवणूक होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोकणात होणाऱ्या या 77 टक्के गुंतवणुकीत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात एका रुपयाचीही गुंतवणूक आली नाही, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच चिपी विमानतळाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या या जिल्ह्यातील स्थानिक युवकांनाच मिळाल्या पाहिजेत. बाहेरच्यांना येथे नोकऱ्या करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. कणकवलीतील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
सत्ताधारी जनतेची दिशाभूल करतात -
कोकणातील ठाणे, पालघर रायगड या जिल्ह्यात गुंतवणूक आली आहे. परंतु सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात एका रुपयाचीही गुंतवणूक आली नाही. आमचा सिंधुदुर्ग जिल्हा दरडोई उत्पन्नात राज्यात पाचव्या नंबरवर होता, त्याचे काय होणार ही चिंता आम्हाला आहे. सिंधुदुर्गातील सत्ताधारी जनतेची दिशाभूल करून जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
बेरोजगार तरुणांना नोकऱ्या कुठून देणार -
उद्योग विभागाच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक सिंधुदुर्गात येत नसेल, तर येथील तरुणांनी काय करायचे तसेच बेरोजगार तरुणांच्या कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या आहेत. हजारो बेरोजगार जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांना नोकऱ्या कशा देणार आहात, असा प्रश्रही त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा आणि खासदारांचा विरोध -
नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेनेचे आमदार वेगळी भूमिका घेत आहेत. स्थानिकांना हा प्रकल्प हवा असल्याने त्यांची भूमिका बदलली आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार त्या प्रकल्पाला विरोध करून बेरोजगारांच्या पोटावर पाय देण्याता प्रयत्न करत आहेत. ठाकरे सरकार या जिल्ह्याच्या प्रत्येक विषयांत अन्याय करत आहे. त्यामुळे जिल्ह्याची अधोगती होत आहे, असेही नितेश राणे म्हटले.
हेही वाचा - शेतकऱ्यांना ‘आवळा’ देऊन आपल्या उद्योजक मित्रांना ‘कोहळा’ देणारी योजना - बाळासाहेब थोरात