सिंधुदुर्ग - नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. परंतु, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्याची मागणी केल्याने व यासाठी केलेला अर्ज परिपूर्ण नसल्याने ही सुनावणी सोमवार (७ रोजी) पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. दरम्यान नितेश राणेंना मानेचा त्रास होत आहे. चक्करही येत आहेत, त्यामुळे त्यांना इथून वैद्यकीय तपासणीकरीता कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
हेही वाचा - Anganewadi Jatra : सिंधुदुर्गातील आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबईहून 10 विशेष एक्स्प्रेस; आरक्षण सुरू
नितेश राणे यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तात्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज दाखल करून घेत वकील संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने शनिवारी दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई दुपारी न्यायालयात हजर झाले होते. परंतु, या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत बचाव पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केला आहे.
या न्यायालयात ही सुनावणी न घेता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्याची मागणी केली होती. परंतु, सरकारी वकील घरत यांनी केलेल्या अर्जावर स्वाक्षरी नव्हती. तो विहित नमुन्यात नव्हता, त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची मागणी नितेश राणे यांच्या वकिलांनी केली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज परिपूर्ण करण्यास मुदत देण्यात आली होती. तरीही वकील घरत यांनी त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला. यावेळी या न्यायालयाने जामीन अर्जावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होईल. तसेच, अपूर्ण दिलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत वेळ दिला आहे.
हेही वाचा - Nitesh Rane Hearing : उपचारासाठी नितेश राणेंना कोल्हापूरला नेण्याची तयारी; जामीन अर्जावर आज सुनावणी
उपचारासाठी नितेश राणेंना कोल्हापूरला नेण्याची तयारी
कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळपासून सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत.
काय आहे प्रकरण
शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुनी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील सचिन सातपुते या आरोपीचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत फोनवरून कॉन्टॅक्ट होता. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणे यांना सह आरोपी करण्याची मागणी जिल्हा न्यायालयाकडे सरकारी वकिलांनी केली होती. तक्रारदाराने देखील आपल्या तक्रारीत आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची नावे दिली होती. याप्रकरणी नवनिर्वाचित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि आमदार नितेश राणे यांचे सचिव राकेश परब यांचे देखील नाव समोर आले होते. या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.