सिंधुदुर्ग - जिल्ह्यात सामान्य रुग्णालयाला आज प्राप्त झालेल्या 136 कोरोना तपासणी अहवालांपैकी 13 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 122 अहवाल निगेटीव्ह आहे आहेत. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 2, कणकवली तालुक्यातील 2 व देवगड तालुक्यातील 2, मालवण तालुक्यातील 6, सावंतवाडी तालुक्यातील 1, दिवसभरात रुग्णांची संख्या 13 ने वाढली आहे.
जिल्ह्यात एकूण 23 हजार 665 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. त्यापैकी 488 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 21 हजार 898 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 279 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 2 हजार 32 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 898 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 86 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 812 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पॉजिटीव्ह अहवालांमध्ये एकाच रुग्णाच्या दोन अहवालांचा समावेश आहे. अजून 134 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 125 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 59 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये 21 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6 हजार 113 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण 85 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 8 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 75 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 मेपासून आज अखेर एकूण 66 हजार 572 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यात कोविड -19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली असून तसा शासन निर्णय आज काढण्यात आला आहे. या प्रयोगशाळेसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येणार आहेत.