सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादळाच्या निकषाप्रमाणे कोकणला नुकसानभरपाई देतानाच किनारी भागातील वीज वाहिन्या भूमिगत टाकण्यासाठी सरकारने योजना आखून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. तर चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे काम पुन्हा एकदा करण्यात आले असून डीजीसीएचे पथक पुन्हा एकदा या विमानतळाची पाहणी करेल, असे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या निकषाप्रमाणे द्यावी नुकसानभरपाई
या चक्रीवादळात ज्यांचे नुकसान झाले आहे. आंबा, काजू व इतर फळबागायतदारांबरोबरच सर्वांना निसर्ग चक्रीवादळाच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. नक्कीच मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करून आमच्या मागणीप्रमाणे विचार करून नुकसानभरपाई देतील, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे.
मृत खलाशांच्या वारसदारांना मिळणार प्रत्येकी चार लाख
देवगड आनंदवाडी बंदरात दोन बोटी बुडाल्या त्यात चा खलाशांचा मृत्यू झाला. शासनाच्या नियमाप्रमाणे मृतांच्या वारसदरांना प्रत्येकी चार लाख रुपये, जे काही देय आहेत त्याची रक्कम आलेली आहे. अधिक पंतप्रधान सहायता निधीतून रक्कम मिळावी, अशी आमची असल्याचे खासदार राऊत म्हमाले.
बागायतदारांना केंद्र सरकारच्या फळपीक विमा योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित
कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू, नारळ बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागायतदारांना शासन कशी मदत करणार, असे विचारले असता खासदार राऊत म्हणाले, बागायतदारांना केंद्र सरकारच्या फळपीक विमा योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे जे निकष लावलेले आहेत त्यामुळे बागायतदारांना या योजनेचा लाभ मिळत नाही. तरीही राज्य सरकारने या बागायतदारांना चांगल्या पद्धतीचे सहकार्य करावे, अशी मागणी केल्याचेही खासदार विनायक राऊत म्हणाले.
एक हजार दोनशे कोटींचा भूमिगत विद्यूत वाहिन्यांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर
चक्रीवादळग्रस्त येथील भागात वीजपुरवठा बऱ्याच दिवसांसाठी खंडित होत असतो. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारचा सायक्लॉन रिलीफ फंड (चक्रीवादळ मदत निधी) आहे. त्यातून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील भूमिगत विद्यूत वाहिन्या टाकण्याचा बाराशे कोटींचा प्रस्ताव सरकारने केंद्राला सादर केला आहे. त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळवून घेणे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे खासदार राऊत म्हणाले.
चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे पुन्हा केले काम
चिपी विमानतळाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. याबाबत बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, डीजीसीएच्या व एअरपोर्ट अथॉरिटीच्या मार्गदर्शनाखाली चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे काम पुन्हा केले आहे. अजून साधारण 25 मे ला एटीआर रिपोर्ट सादर केल्यानंतर डीजीसीएचे पथक पुन्हा पाहणीसाठी येणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
हेही वाचा - सिंधुदुर्गात मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध; मराठा समाज आंदोलक ताब्यात