सिंधुदुर्ग - खासगी डॉक्टर सर्वसामान्य रुग्णांची लूट करत आहेत. प्रसूती करण्यासाठी रुग्णालयांमध्ये तब्बल 50 ते 95 हजार रुपये आकारण्यात येत आहेत. कुडाळमध्ये असाच एक प्रकार घडला. मात्र त्याठिकाणी खासगी डॉक्टरांना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पाठिशी घातले आहे. जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. श्रीमंत चव्हाण यांच्या बदलीमागे तेच कारण आहे. तसेच जनतेची मागणी नसताना केवळ स्वार्थासाठी बदली देण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खासगी रुग्णालयांविषयी भूमिका मांडली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री,जिल्हा सचिव बाळा पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, देवगड तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, प्रसाद गावडे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
सिव्हिल सर्जन डॉ. श्रीमंत चव्हाण यांची बदली करत सत्ताधारी पुन्हा एकदा जनतेला लुटण्यांची साथ देत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मेडिकल काऊन्सिलच्या दरानुसार रुग्णांना कोटेशन, छापील बिलं दिली जात नाहीत. यामुळे त्यांची लूट होत आहे. खासगी डॉक्टर सिझरींगसाठी 50 ते 95 हजार रुपये आकारत आहेत. कुडाळमध्ये बिलांच्या वादातून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. त्याची कोणतेही दखल न घेता डॉक्टरांना वाचवण्यासाठी अवघ्या 2 महिन्यांत बदली करण्यात आली. मागील सिव्हिल सर्जनबद्दल अनेक तक्रारी असताना त्यांनी बदली करण्यात आली नाही. मात्र आताचे सिव्हिल सर्जन यांची बदली करून सत्ताधाऱ्यांनी काय साधले, असा प्रश्न उपरकरांनी उपस्थित केला.