सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गोव्यातून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ येत असून कुडाळ एमआयडीसीमध्ये आणि हायवेवरील एका लाकूड गिरणीच्या मागे तरुण व तरुणी रात्रीच्या वेळी जमतात व या पदार्थांचे सेवन करतात, असा दावा मनसेचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. तसेच, या साखळीत काही राजकीय नेत्यांचाही हात आहे. हे नेते मटका, जुगार या अवैध धंद्यासाठी बेरोजगार तरुणांचा वापर करत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला..
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचीच खरेदी-विक्री सुरू आहे. गोव्यावरुन सावंतवाडी व तेथून संपूर्ण जिल्ह्यात या अमली पदार्थांचे जाळे विणले गेले आहे. अनेक तरुण-तरुणी या अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत, असे उपरकर म्हणाले. यापूर्वी सावंतवाडीत गांजा, हेरॉईन, चरस पकडले गेले आहे. येथीलच एका व्यक्तीच्या माध्यमातून या अमली पदार्थांचा पुरवठा जिल्ह्यात होत आहे, असेही उपरकर म्हणाले.
जिल्ह्यात अमली पदार्थांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. मध्यंतरी हेरोइन कनेक्शन असलेल्या काहींना अटक झाली होती. मुंबईत आत्महत्या केलेल्या सुशांत सिंह राजपूत या प्रकरणातील अमली पदार्थांची लिंक गोव्याची आहे. सिंधुदुर्गमध्येही याच गोव्याच्या लिंकमार्फत अमली पदार्थ जिल्ह्यात येतात. या पदार्थांच्या सेवनासाठी कुडाळ एमआयडीसी एरिया तसेच हायवेवरील एका लाकूड गिरणीच्या पाठीमागे तरुण-तरुणी एकत्र जमतात, अशी माहितीही उपरकर यांनी यावेळी दिली.
हे ध्यानी घेता, आपली पाल्ये काय करतात, कुठून पैसे आणतात, रात्री-अपरात्री कुठे फिरतात, याबाबत पालकांनी दक्ष असणे गरजेचे आहे. गोव्यावरुन सावंतवाडीत येणाऱ्या अंमली पदार्थामध्ये एका विशिष्ट समाजाचे लोक आहेत. त्यातील एक व्यक्ती गोव्यातील स्टॉलवरून दिवसाला चार-चार वेळा जाऊन येते. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात माया गोळा झालेली आहे, अशी संपूर्ण सावंतवाडी चर्चा आहे. अशाच प्रकारे तरुण अवैध मटका जुगार यात गुंतलेले दिसतात.
जिल्ह्यात काही लोकप्रतिनिधी मटका, जुगाराचे काम करत आहेत. झटपट पैशासाठी ते या तरुणांचा वापर करतात. यातून काही तरुण व्यसनाच्या मोठ्या प्रमाणात आहारी जात आहेत. सिंधुदुर्गात मुंबईहून आलेले काही बेरोजगार व स्थानिकही या दारूधंद्यात मोठ्या प्रमाणात गुंतले आहेत. जिल्ह्यात अवैध दारूची होणारी वाहतूक गावा-गावापर्यंत पोहोचली आहे. ऑनलाईन कसिनोमध्ये यापूर्वी अनेकांचे पैसे गेले. या नादाला लागलेल्या काही तरुणांनी घरफोडी केल्याचेही प्रकार घडले आहेत. याबाबत पक्षपातळीवर आवाज उठवला असला, तरी जिल्ह्यातील ही तरुण पिढी वाचवण्यासाठी कोणतेही राजकारण न करता पालक, लोकप्रतिनिधी, पोलिसांनी एकत्र येण्याची गरज आहे. पोलिसांना आज कदाचित सहज पैसे मिळतात असे वाटत असले तरी त्यांचीही मुले भविष्यात अडकू शकतात. त्यामुळे भावी पिढी वाचवण्यासाठी आत्तापासूनच सर्वांनी प्रयत्न केले, तरच ही पिढी वाचेल असेही उपरकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - भारतीय पोस्ट सप्ताह विशेष : सिंधुदुर्गातील सुपुत्रांचा भारतीय पोस्टाकडून गौरव